अमरावती Unseasonal Rain : अमरावती विभागात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाट आणि वादळ वाऱ्यांसह बरसलेल्या अवकाळी पावसामुळं शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर बैल, घोडा यांच्यासह एकूण सात प्राणी दगावले आहेत. हवामान खात्यानं आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवलीय.
लहान मोठे सात प्राणी दगावले : 26 आणि 27 फेब्रुवारीला अमरावती विभागात झालेल्या अवकाळी पावसामुळं बरेच नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला तर अकोला जिल्ह्यात घोडा दगावला आहे. बुलडाणा जिल्ह्यात गाईचे दोन वासरू वीज पडल्यामुळं दगावले आहे. तर वाशिम जिल्ह्यात देखील एक बकरी आणि गाय दगावली आहे.
पाचही जिल्ह्यात पिकांचे नुकसान : जिल्ह्यातील दोन तालुक्यात वादळी पावसामुळं एकूण 145 गावांना फटका बसलाय. 2278 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. यात गहू, ज्वारी, संत्रा आणि भाजीपाला अशा पिकांचं मोठं नुकसान झालं. अकोला जिल्ह्यात एकूण चार तालुक्यांमध्ये येणाऱ्या 361 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून हरभरा, तूर, गहू, मका, ज्वारी, कापूस, कांदा, भाजीपाला ही पिकं बाधित झाली आहेत.
'या' गावाला अवकाळी पावसाचा फटका : यवतमाळ जिल्ह्यात 32 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकूण 450 हेक्टरवरील शेत जमिनीवरील गहू आणि हरभरा हे पीक हातचे गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यात 259 गावातील एकूण 21 हजार 768 हेक्टर शेत जमिनीवरील हरभरा, तूर, गहू, मका, ज्वारी, कापूस, कांदा, भाजीपाला या पिकांचं नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून एकूण 26 गावांमधील 3014 हेक्टरवरील गहू, ज्वारी पिकाचं नुकसान झाले आहे.
हेही वाचा -