शिर्डी Sai Baba Sansthan Shirdi : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी हे साई मंदिर आणि परिसरात कार्यरत असतात. भाविकांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी हे कर्मचारी रात्रंदिवस काम करत असतात. आता याच कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय जाहीर केलाय. मात्र, हा निर्णय घेताना सरकारनं गुप्तता पाळली असल्याचं दिसून आलं.
कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत : शिर्डीच्या साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करुन घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. थोडक्यात हे कर्मचारी आता 'पर्मनंट' कर्मचारी झाले आहेत. हा निर्णय घेताना अत्यंत गुप्तता पाळत गमिनी काव्यानं 25 वर्षाचा हा प्रश्न मार्गी लावल्याचं खुद्द विखे पिता-पुत्रांनींच जाहीर सांगितलं.
गनिमी काव्यानं निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गनिमी काव्यानं सत्ता स्थापन केली. त्यानंतर पार्ट दोन म्हणजेच गनिमी काव्यानं साई संस्थानच्या 598 कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचं माजी खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलं. साई संस्थानच्या 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वितरण करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर आपल्याकडं लोकांचं चांगलं झालेलं पाहावत नाही. त्यामुळं गुप्तता पाळून हा निर्णय तडीस नेल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
25 वर्षापासून प्रश्न प्रलंबित : गेल्या 25 वर्षापासून साई संस्थानच्या सेवेत असलेल्या सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. यापैकी 1052 कर्मचाऱ्यांना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी कायम सेवेत घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 598 कर्मचारी कायम सेवेत येणे बाकी होते. तेव्हापासून या कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता. यामध्ये अनेकदा राजकारणही झालं असल्याचं बोललं जातं.
साई संस्थानवरचा आर्थिक भार वाढणार : साई संस्थानच्या वतीनं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते कायम नियुक्ती आदेशाचं वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आलं. या निर्णयानं साई संस्थानवरचा आर्थिक भार वाढणार आहे. मात्र, शिर्डीत येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा देत कर्मचारी हे उत्पन्न वाढवतील, असा विश्वासही विखे पाटलांनी व्यक्त केला.
हेही वाचा - साईबाबांसह बाबा केदारनाथांचंही घेता येणा