नाशिकः राजकीय नेत्यांसोबत दिल्लीपर्यंत संबंध असल्याचे भासवून राज्यपालपद मिळवून देतो, असे सांगून तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डींची पाच कोटींची फसवणूक करणाऱ्या निरंजन कुलकर्णीला नाशिक पोलिसांनी नागपूरमधून अटक केलीय. निरंजन कुलकर्णी हा भाजपा आणि संघाच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल करत केंद्रातील नेत्यांपर्यंत ओळख असल्याचं सांगायचा.
रेड्डींकडून पाच कोटी निरंजन कुलकर्णीनं लुबाडले होते : राज्यपालपद देण्यासाठी शिफारस करण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी यांच्याकडून पाच कोटी निरंजन कुलकर्णीनं लुबाडले होते, निरंजन कुलकर्णी हा नाशिकच्या मोटवानी रोड परिसरातील रहिवासी आहे. तसेच तो भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेते अन् पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचा. तसेच दिल्ली, मुंबई सरकारतर्फे झालेल्या कार्यक्रमाचे व्हीआयपी निमंत्रण मिळत असल्याच्या पासचे फोटोदेखील तो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करीत होता.
कुलकर्णीच्या गाडीवर कमळाचा झेंडा : संशयित निरंजन कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये किमतीची गाडी खरेदी केली होती आणि त्या गाडीच्या बोनेटवर भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाचा फोटो लावला होता. भाजपा आणि संघाच्या बड्या नेत्यांसोबत राज्यपाल आणि मंत्र्यांसोबत काढलेल्या फोटोतून आपली त्यांच्यासोबत उठबस असल्याचं तो दाखवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातून आपण राज्यपालपद मिळवण्यासाठी शिफारस करू शकतो, असं सांगून शास्त्रज्ञ रेड्डी यांना त्यानं पाच कोटींचा गंडा घातला.
संस्थेच्या नावावर घेतले पैसे : रेड्डी यांना पाच कोटींना गंडा घालणारा नीरज कुलकर्णी याने नागपुरातील वैश्विक सेवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या खात्यावर काही कोटींची रक्कम घेतल्याचं तपासात उघड झालंय, याप्रकरणी संस्थेतील चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तसेच काही कोटींचे धनादेश थांबवले असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी सांगितलंय.
अशी झाली ओळख : रेड्डी हे नाशिकला एका नातेवाईकांच्या पूजा विधीसाठी आले असताना संशयित कुलकर्णी सोबत त्यांची ओळख झाली. राजकीय ओळखीचा दावा करीत त्याने रेड्डी यांचा विश्वास संपादन केला. मग 12 जानेवारी 2024 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळील एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली, त्यावेळी मी कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो, त्यासाठी मला 15 कोटी रुपयांचा सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल, असं कुलकर्णीनं रेड्डींना सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला रेड्डींनी पाच कोटी आठ लाख रुपये कुलकर्णीला दिले होते.
विश्वास संपादन करण्यासाठी जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवले : नरसिम्मा रेड्डींचा विश्वास जिंकण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे 100 एकर जमीन शासनाकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचं निरंजन यानं सांगितले, या जमिनीच्या व्यवहाराबाबतचे भारत सरकारची मोहर असलेली बनावट कागदपत्रे त्याने रेड्डी यांना दाखवले. तसेच नाशिकच्या चांदशी गावातसुद्धा त्याने स्वतःच्या नावावर जमीन असल्याचे खोटे कागदपत्रे दाखवून रेड्डी यांना गंडा घातला.
हेही वाचा -