मुंबई Education Department : शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात चौघांविरोधात कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचं तपासात समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालयीन शाखा असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून बनावट चेक तयार करून त्यावर बोगस शिक्के आणि सह्यांचा वापर करून ते चेक खरे असल्याचं संबंधित बँकेचे भासवून त्या 10 चेकद्वारे नमिता बग या नावाच्या खात्यावर 13 लाख 93 हजार, प्रमोद सिंग नावाच्या खात्यात 9 लाख 86 हजार, तप कुमारच्या नावे 9 लाख 65 हजार, तर महिला झिनत खातून हिच्या नावे 14 लाख 16 हजार जमा झाली असून अशा प्रकारे एकूण 47 लाख 60 हजार इतक्या रक्कमेचा चार अज्ञात व्यक्तींनी संगनमत करून सरकारी पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आरोपींच्या नावाने बनावट चेक द्वारे पैसे जमा करण्यात आले. ती बँक खाते पश्चिम बंगाल आणि चेन्नई येथील असल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. तशा प्रकारे पोलिसांचा तपास सुरू आहे. तर लवकरच या गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान पर्यटन विभागाच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून 68 लाख रुपये बनावट चेकद्वारे काढले गेले होते. याप्रकरणी 2 मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी सारखीच असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -
- Online Financial Fraud Mumbai: विद्युत बिल थकित असल्याचा मॅसेज आला....Appवर माहिती भरताच बॅंकेतून लाखो रुपयांची चोरी
- भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात अडकल्याची केली बतावणी; तरुणीला घातला 1 लाख ९५ हजार रुपयांना गंडा - Mumbai Cyber Crime
- वाहन चोरीच्या संशयावरुन 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत खून; आरोपीला पोलिसांकडून अटक - Mumbai Crime News