ठाणे : राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळं राज्यात संतापाचं वातावरण असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 17 वर्षीय आरोपीनं 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर शहरातील दसरा मैदान परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची नेपाळची असून ती आईवडिलांसह उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमध्ये राहते. पीडित मुलीचे वडील त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर अल्पवयीन आरोपीही याच इमारतीमध्ये दिवसपाळीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शिवाय तो शहरात फिरून फुगेही विक्री करत असून तो मूळचा राजस्थान राज्यातील रहिवासी आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे आरोपी हा कामावर आला. त्यावेळी मुलीचे आई वडील कामानिमित्तानं घराबाहेर गेले होते, त्यामुळं आरोपीला मुलगी घरात एकटी असल्याचं माहीत होतं.
घरात घुसून अत्याचार : मुलगी घरात एकटी असताना आरोपीनं मुलीच्या घरात घुसून दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, शेजारच्या घरातील रहिवाशांना संशय आल्यानं त्यांनी बंद दरवाजा उघडला असता मुलगी रडत असल्याचं दिसलं. इमारतीतील रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देऊन आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलीची मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, तपासणी अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात : पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. पीडित मुलीचं कुटुंब नेपाळचं असल्यानं आणि परिसराशी अपरिचित असल्यानं आम्ही त्यांना न्यायाचं आश्वासन दिलं असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकार्यानं सांगितलं.
हेही वाचा