मुंबई Tuberculosis Patient : मुंबईकर सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. कुठे खोदून ठेवलेले रस्ते, तर कुठे कधी नव्हे ते भेडसावणारी पाणी टंचाई, ट्राफिक, प्रदूषण अशा सर्वच समस्यांना मुंबईकर पुरून उरत आहेत. त्याला 'मुंबई स्पिरिट' असं गोंडस नाव देण्यात आलय. या सगळ्याचा परिणाम मात्र, मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे पालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी. बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागानं क्षयरोगाबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलीय. या आकडेवारीनुसार, पालिकेच्या आरोग्य विभागाला वर्षभरात 4 हजार 66 किशोरवयीन टीबी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं सध्या मुंबईकरांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अशी आहे आकडेवारी : पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 0 ते 15 वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये 2021 ते 2023 या तीन वर्षात 12893 रुग्ण आढळले. 2021 मध्ये 4569 किशोरवयीन टीबी बाधित (TB) रुग्णांची नोंद करण्यात आलीय. 2022 मध्ये 4,285 मुलांना क्षयरोग झाल्याचं समोर आलंय. हीच संख्या 2023 मध्ये 466 इतकी झाली. 2023 मध्ये एकूण एक लाख 52 हजार आठ रुग्णांची तपासणी करण्यात आलीय. यात पुरुष आणि स्त्री क्षयरोग बाधित रुग्णांचं प्रमाण साधारणतः सारखंच आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेली 2022 मधील आकडेवारी पाहता मुंबईत क्षयरोगाचे 55 हजार 284 रुग्ण आढळले होते. तर, वर्ष 2023 मध्ये या रुग्णांची संख्या 50 हजार 206 इतकी आढळली.
'या' आजाराची लक्षणं काय? : या संदर्भात बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं की, क्षयरोग बाधित रुग्णांमध्ये दोन आठवड्यांपासून अधिक कालावधीचा खोकला असतो. दोन आठवड्यांहून अधिक कालावधी रुग्णाला ताप असतो. रुग्णाचं वजन कमी होतं. भूक मंदावते. रात्री घाम येतो आणि मानेवर गाठ येते. अशी लक्षणं असतील तर संबंधित व्यक्तीनं तातडीनं नजिकच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि वेळेत उपचार घ्यावेत.
उपचारासाठी पालिकेच्या उपाययोजना : यासंदर्भात बोलताना डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत मुंबईत 42 सीबीनॅट मशीन, 10 ट्रूनॅट मशीन्स, 3 कल्चर आणि डीएसटी लॅबद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसंच 25 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 6 खासगी केंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधा ही रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. सोबतच पालिकेच्या क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेत सहभागी झालेल्या निवडक खासगी हॉस्पिटल आणि निवडक खासगी डॉक्टरांकडं रुग्णांना क्षयरोगाचं मोफत निदान करता येणार आहे. मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी पालिका प्रभावपणे उपाययोजना राबवत आहे.
मुंबईच्या क्षय रुग्णांच्या संख्येत घट : पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी वर्षा पुरी यांनी सांगितलं की, 2022-23 च्या आकडेवारीनुसार क्षयरोग बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं. फक्त किशोरवयीन मुलांमध्येच नाही तर 19 वर्षांवरील रुग्णांच्या संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून येतं. पालिकेनं उपचार पद्धती आणि प्रक्रिया वाढवली आहे. सोबतच खासगी रुग्णालयांनाही त्यांच्याकडं क्षयरोग बाधित रुग्ण आल्यास त्याची माहिती, पालिकेला देणं आता बंधनकारक केल्यानं बाधितांचा आकडा वाढल्याचं दिसून येत आहे. पालिका सध्या अनेक पातळीवर उपाययोजना राबवत आहे. जास्तीत जास्त रुग्णांचं निदान होऊन 2025 पर्यंत मुंबईत क्षय रोगाचं प्रमाण शंभर टक्के कमी करण्याचं पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा -
- जागतिक क्षयरोग दिन : माधवराव पेशव्यांचा क्षयरोगानं गेला होता बळी; पूर्णपणे बऱ्या होणाऱ्या क्षयरोगाची लक्षणं समजून घ्या - World TB Day
- Tuberculosis Test : मिठाईच्या दुकानात कर्मचाऱ्यांची होणार क्षयरोगाची चाचणी; अभिनव संकल्पनेला ठाण्यातून सुरुवात
- Pediatric TB Found To Affect Lung : बालपणी झालेला क्षयरोग फुफ्फुसाच्या कार्यावर करतो वाईट परिणाम