नाशिक Jewels Loot Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेस कंपनीच्या इको गाडीला सहा जणांनी दोन वेगवेगळ्या कारमध्ये येऊन घोटी नजीक माणिकखांब शिवारात 17 जानेवारीला रात्री अडविले. (Ex Servicemen in Robbery) यानंतर चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरचीची पूड फेकत लूट केली होती. यात त्यांनी साडेचार किलो सोने आणि 135 किलो चांदीचे दागिने असा सुमारे 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. (Nashik Crime)
पाच संशयितांना अटक : कारचालक गोपालकुमार अशोककुमार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. लुटलेल्या दागिन्यात नाशिकसह जळगाव, धुळे सराफांचे दागिने होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीच्या जबाबावरून थेट आग्रा पर्यंत माग काढला. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वेगवेगळ्या सहा ठिकाणी स्वतंत्र पथके पाठवून सतत तीन दिवस अहोरात्र पाळत ठेवली. आग्रा जिल्ह्यातील खेरागड भागातून देवेंद्रसिंग परमार, आकाश परमार, हुबसिंग ठाकूर, शिवसिंग ठाकूर, जाहीर सुखा या पाच संशयितांना अटक केली. त्यापैकी दोघांकडून पोलिसांनी एक कोटी चाळीस लाखांचे दागिने आणि दोन कार जप्त केल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात तिघे सैन्य दलातून निवृत्त झालेले जवान आहेत.
मुख्य सूत्रधार व्यापारी : मुख्य सूत्रधार आग्रा नजीक जगनेर येथील देवेंद्रसिंह परमार असून त्यानेच जाहीर खान आणि शिवसिंग यांच्या मदतीनं लुटीचा प्लॅन बनवला होता. शिवसिंग ठाकूर हा फळांचा व्यापारी असून तो नियमित नाशिकमध्ये येऊन द्राक्ष, डाळिंब खरेदी करून तो विक्री करण्यास आग्रा येथे नेत असल्यानं त्यास नाशिकच्या या रस्त्यांची माहिती होती. त्याने लुटीच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली असं पोलिसांनी सांगितलं.
यामुळे आखला लुटीचा प्लॅन : संशयित आरोपी सैन्य दलातील निवृत्त जवान जहीर खान यानं मुंबईतील रियल इस्टेट कंपनीत 50 लाखाहून अधिक पैसे गुंतवले होते. मात्र कंपनी बुडाल्याने ही रक्कम पुन्हा कमवण्यासाठी तो व्यवसायाच्या शोधात असतानाच त्याची आग्रा जवळील देवेंद्रसिंग यांच्याशी ओळख झाली आणि देवेंद्रसिंग यांने बनवलेल्या लुटीच्या प्लॅनमध्ये तो सहभागी झाला होता.
हेही वाचा: