मुंबई Flamingo Birds Died : घाटकोपर परिसरात विमानाला धडकून 32 फ्लेमिंगो पक्षांचा (Flamingos Birds) मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही दुर्घटना सोमवारी रात्री घडली असून, घाटकोपर मधील स्थानिक रहिवाशांना हे पक्षी मृत अवस्थेत आढळले. स्थानिकांनी याची माहिती रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर या संस्थेला आणि वनविभागाला दिलीय.
32 मृत फ्लेमिंगो जप्त : रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर या संस्थेनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्षी दिसल्याचं अनेकांना फोन येत होते. वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह सेलनं तसेच RAWW च्या पथकांनी शोध मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री परिसरात 32 मृत फ्लेमिंगो जप्त केले. मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
फ्लाइटला फ्लेमिंगो पक्षी धडकले : मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या ईके ५०८ या फ्लाइटला फ्लेमिंगो पक्षी धडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या विमानात 310 प्रवासी होते. EK 508 ने रात्री 9.18 वाजता आगमन झाल्यावर पक्षी धडकल्याची माहिती दिली. त्यामुळं विमानाचं नुकसान झालं असलं तरी, विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरलं. सध्या हे विमान मुंबई विमानतळावरच थांबवण्यात आलं आहे.
स्थानिक रहिवाशांचा आला फोन : खारफुटी संवर्धन कक्षाचे वन अधिकारी प्रशांत बहादरे यांनी सांगितलं की, मी विमानतळावर गेलो, पण त्यांनी मला आत जाऊ दिलं नाही. या फ्लेमिंगोला एमिरेट्सच्या विमानानं धडक दिल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्हाला स्थानिक रहिवाशांचा फोन आला आणि आमची टीम रात्री 9.15 वाजता घटनास्थळी पोहोचली होती.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी : नेटकनेक्ट फाऊंडेशनचं संचालक बी एन कुमार यांनी सांगितलं की, त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला ईमेल पाठवून एमिरेट्सचे विमान पक्ष्यांवर कसे आदळले आणि पायलटला हे दिसले नाही का? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलीय. दरम्यान, या संदर्भात आम्ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं की, 'ही घटना हवेत घडल्यानं ती संबंधित एअरलाईन कंपनीशी निगडित आहे. यात एअरपोर्ट प्रशासन हस्तक्षेप करत नाही.
हेही वाचा -
अचानक विमान कर्मचारी सामूहिक रजेवर! एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा ठप्प - Air India Express