जळगाव Onion Rotted In Jalgaon : विविध संकटांना शेतकरी तोंड देत असताना शेतकऱ्याने शेतातील चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञाताने रासायनिक खत टाकले आहे. यामुळे एका चाळीतील कांदा सडून गेला असून त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण चाळीतील कांदा सडला : भडगाव तालुका शेतकी संघाचे संचालक गोविंद एकनाथ माळी यांनी यावर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले होते. पिकवलेला कांदा काढतेवेळी कवडीमोल भाव असल्यामुळे त्यांनी साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डावा कालव्यालगत असलेल्या पुलाजवळ कांदाचाळीची उभारणी करून तेथे २५ ते ३० टन कांदा त्यांनी चाळीमध्ये भरून ठेवला होता. त्यापैकी एका चाळीमधील कांदा तपासला असता तो संपूर्ण सडलेला आढळून आला. त्या चाळीला लागूनच असलेल्या बाजूच्या चाळीमध्ये संपूर्ण कांदा चांगल्या स्थितीत आढळून आला आहे. फक्त एकाच चाळीमधील कांदा संपूर्ण सडून गेला आहे. त्यामुळे अज्ञाताने कांदा चाळीत रासायनिक खत टाकून नुकसान केल्याचा संशय शेतकऱ्याला आहे.
शेतकऱ्याचे लाखाेंचे नुकसान : शेतकरी गोविंदा माळी हे कांदा चाळीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. अज्ञात माथेफिरूविरुद्ध शेतकऱ्यांनी भडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पांडुरंग सोनवणे करीत आहेत. घटनास्थळाचा तलाठी संजय सोनवणे यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे आजच्या बाजारभावानुसार शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
'या' जिल्ह्यातही घडली होती अशीच घटना : अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने कांदा सडल्याची घटना छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे 20 सप्टेंबर, 2021 रोजी घडली होती. गट क्रमांक ९८ मध्ये असलेल्या शेडमध्ये कांदाचाळीत साठून ठेवलेल्या कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. कांदा चाळीतील सुमारे २०० क्विंटल कांदा सडल्याने शेतकरी नितीन परभने यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी नितीन परभने यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांदा विक्रीतून नफा मिळण्याच्या आशेने सात ते आठ महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने परभने यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले होते.
हेही वाचा :