रांची Yashasvi Jaiswal : रांची कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल डावात 37 धावा करुन बाद झाला. यशस्वी जैस्वालला दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण करता आलं नसलं तरी त्यानं आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच विशेष कामगिरी केलीय.
थेट डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीत स्थान : जैस्वाल हा आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनलाय. जागतिक कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास तो दुसरा फलंदाज ठरला आहे. जैस्वालनं आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांत 973 धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. डॉन ब्रॅडमननं पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1210 धावा केल्या होत्या. तर भारताकडून सुनील गावसकरनं आपल्या पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 936 धावा करण्याचा पराक्रम केला होता. हा विक्रम आता यशस्वी जैस्वालनं मोडून काढलाय.
कारकिर्दीतील पहिल्या 8 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- डॉन ब्रॅडमन- 1210 धावा
- यशवी जैस्वाल - 971 धावा
- सुनील गावसकर - 936 धावा
घरच्या मालिकेत सर्वाधिक धावा : याशिवाय घरच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जैस्वालनं विराट कोहलीची बरोबरी करण्यात यश मिळवलंय. जैस्वालनं या मालिकेत आतापर्यंत 655 धावा केल्या आहेत. या मालिकेतील अजून एक कसोटी सामना खेळायचा बाकी आहे. विराट कोहलीनंही 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 8 डावात 655 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर घरच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकरच्या नावावर आहे. गावसकरनं 1978 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 9 डावात 732 धावा केल्या होत्या. सध्या इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील एक सामना बाकी आहे. त्यामुळं सुनील गावसकरांचा हा विक्रम मोडण्याची संधी यशस्वी जैस्वालकडं आहे.
हेही वाचा :
- 'बडे मियाँ ते बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह...'; सर्फराजनंतर लहान भावाचा मोठा कारमाना, थेट वसीम जाफरच्या विक्रमाशी बरोबरी
- WPL MI vs DC : विकेट, चौकार, षटकार,...; पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबईनं शेवटच्या चेंडूवर जिंकला हरलेला सामना
- IND vs ENG 4th Test 2nd Day : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारतानं गमावल्या सात विकेट