दांबुला (श्रीलंका) INDW vs BANW Semi-final 1 : महिला आशिया चषक 2024 चा पहिला उपांत्य सामना आज भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा एकहाती पराभव करत सलग नवव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी केवळ 81 धावांचं लक्ष्य होतं, जे भारतीय संघानं केवळ 11 षटकांत पूर्ण केलं. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 जुलै रोजी होणार आहे.
स्मृतीचं झंझावाती अर्धशतक : भारताकडून सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानानं 39 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. तर शेफाली वर्मानंही 26 धावा केल्या. शेफालीनं 28 चेंडूत 2 चौकार मारले. या दोघांनीही शानदार फलंदाजी करत बांगलादेशला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही.
राधा-रेणुकाची घातक गोलंदाजी : तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाला निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 80 धावा करता आल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानानं सर्वाधिक 32 धावा केल्या. याशिवाय केवळ शोर्ना अख्तर (नाबाद 19 धावा) दुहेरी आकडा गाठू शकली. भारताकडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि फिरकीपटू राधा यादवनं प्रत्येकी तीन बळी घेतले. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आठव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा भारताचा प्रयत्न : भारतीय महिला क्रिकेट संघ विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचं विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. भारतानं एकदिवसीय स्वरुपात चार आणि टी 20 स्वरुपात तीन जेतेपदं पटकावली आहेत. महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरु झाला आणि भारतीय संघ त्यावेळी विजेता बनला. 2008 पर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय स्वरुपात खेळली जात होती. तर 2012 पासून टी-20 स्वरुपात खेळला जात आहे. या चषकाचा हा नववा हंगाम आहे आणि भारतानं आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा (2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022) विजेतेपद पटकावलं आहे. तर भारताव्यतिरिक्त फक्त बांगलादेशनं एकवेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
हेही वाचा :