नवी दिल्ली PM Replaced captain to Play Cricket : क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला अनेकदा विचित्र घटना पाहायला मिळतात. मैदानावर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाला मैदानावर क्रिकेट खेळताना पाहिलंय का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याचा संबंध पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी आहे.
कर्णधाराला हटवून स्वत: उतरले मैदानात : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) चे ज्येष्ठ नेते नवाझ शरीफ त्यांच्या तरुणपणात क्रिकेट खेळायचे. त्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम होतं. क्रिकेटवरील हे प्रेम त्यांना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 22 यार्डच्या पिचपर्यंत घेऊन गेलं. नवाझ शरीफ यांनी स्वतः कॅप्टन बदलून मॅचचे नेतृत्व केले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 2011 मध्ये त्यांच्या 'पाकिस्तान: अ पर्सनल हिस्ट्री' या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केलाय.
इम्रान खान यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की, ऑक्टोबर 1987 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी मी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार होतो. आमचा संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मॅच खेळणार होता. त्याआधी क्रिकेट बोर्डाचे सचिव शाहिद रफी यांनी मला सांगितलं होतं की, नवाझ शरीफ हे संघाचं नेतृत्व करतील आणि सामना खेळतील. नवाझ शरीफ हे त्यावेळी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. हा सामना वेस्ट इंडिज आणि पंजाब मुख्यमंत्री इलेव्हन यांच्यात खेळला गेला.
नवाझ शरीफ यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा केला सामना : नवाझ शरीफ यांनी वेस्ट इंडिजचे कर्णधार व्हिव्ह रिचर्ड्ससोबत नाणेफेक केली. ते मुदस्सर नजरसोबत डावाची सुरुवात करायला आले. एकीकडं मुदस्सर नजरनं बॅटिंग पॅड, थाई पॅड, चेस्ट पॅड, आर्म गार्ड आणि हेल्मेट घातले होते, तर दुसरीकडं शरीफ यांनी फक्त बॅटिंग पॅड आणि फ्लॉपी कॅप घातली होती. अशा परिस्थितीत इम्रान खान चिंतेत होते. कारण नवाझ शरीफ जी बॉलिंग लाइनअप खेळणार होते ती त्यावेळची जगातील सर्वात धोकादायक बॉलिंग लाइनअप होती. त्यांचे चार गोलंदाज ताशी 90 मैलांपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करत असत.
दुसऱ्याच चेंडूवर नवाझ शरीफ झाले क्लीन बोल्ड : जगभरातील फलंदाज त्या गोलंदाजांना घाबरत होते. त्याच्या बाऊन्सरपासून बचावणं कठीण होतं. अशा परिस्थितीत नवाज शरीफ हे सुरक्षेशिवाय मैदानात उतरले होते. यावेळी इम्रान यांना वाटलं की जर शॉर्ट बॉल शरीफ यांच्या शरीरावर आदळला असता तर त्यांना स्वतःला वाचवणे कठीण होते. त्यावेळी इम्रान यांनी रुग्णवाहिका तयार ठेवायला सांगितली. मात्र, वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर नवाझ शरीफ यांनी पहिल्याच चेंडूवर बाजी मारली आणि दुसऱ्या चेंडूवर ते क्लीन बोल्ड झाले. त्यामुळं इम्रान खानसह संपूर्ण संघाला दिलासा मिळाला. या सर्व गोष्टी इम्रान खाननं आपल्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत.
हेही वाचा -