नवी दिल्ली U19 Cricket World Cup Final : अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना रविवारी (11 फेब्रुवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. टीम इंडियानं पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सनं पराभव केला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत कांगारूंनी पाकिस्तानला 1 गडी राखून धूळ चारली.
वर्षभरातील तिसरी अंतिम फेरी आहे : वर्षभरात भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडिया 7-11 जून दरम्यान लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली होती. या सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर या दोन संघांमध्ये 19 नोव्हेंबरला विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाची कामगिरीही उत्कृष्ट : आता भारताच्या युवा संघाला विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या सलग दोन पराभवांचा बदला घेण्याची संधी आहे. याची जबाबदारी टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनच्या खांद्यावर असेल. मात्र आतापर्यंत या स्पर्धेत भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियाची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्यांनी एकही सामना न गमावता अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत अंतिम सामना अत्यंत अतीतटीचा होणार यात शंका नाही.
भारतीय संघ सर्वात यशस्वी : भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियानं 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला होता. आता भारतीय संघाची नजर सहाव्या विजेतेपदावर आहे. भारतानंतर, ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक तीन वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकलाय. त्यांनी 1998, 2002 आणि 2010 च्या मोसमात विजेतेपद पटकावलं. कांगारूंना दोनदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला, आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळा भारतीय संघानं त्यांचा पराभव केला आहे.
भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
ऑस्ट्रेलियाचा संघ : हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यूज वायबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफे मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महाली बियर्डमन, कॅलम विडलर, लचलान एटकेन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा , एडन ओ'कॉनर.
हे वाचलंत का :
- डेव्हिड वॉर्नरनं क्रिकेटच्या इतिहासात कोरलं नाव; वेस्ट इंडिजचा 11 धावांनी पराभव
- मराठमोळ्या सचिन धसच्या खेळीनं भारतीय यंग ब्रिगेड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात; कुटुंबीय 'ETV भारत'वर Exclusive
- जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत मिळवलं अव्वल स्थान; 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज