हैदराबाद IPL 2024 SRH vs RCB : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ विजयी मार्गावर परतलाय. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात सलग 6 पराभवानंतर त्यानं पहिला विजय नोंदवलाय. गुरुवारी झालेल्या सामन्यात आरसीबीनं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 35 धावांनी पराभव केलाय.
धावडोंगर उभारणारे हैदराबादचे फलंदाज अपयशी : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. यात आरसीबीनं हैदराबादला 207 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र, हैदराबादचा संघ घरच्या मैदानावर 8 विकेट गमावून केवळ 171 धावा करू शकला. सनरायझर्ससाठी एकही फलंदाज चमकदार कामगिरी करू शकला नाही. शाहबाज अहमदनं सर्वाधिक 40 धावांची नाबाद खेळी खेळली. तर अभिषेक शर्मा आणि कर्णधार पॅट कमिन्सने 31-31 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. फिरकीपटू स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा आणि वेगवान गोलंदाज कॅमेरुन ग्रीननं प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय विल जॅक आणि यश दयाल यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
पाटीदारचं आक्रमक तर विराटचं संथ अर्धशतक : तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 7 गडी गमावून 206 धावा केल्या. संघासाठी विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. रजतनं 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 20 चेंडूत 50 धावा केल्या. तर कोहलीनं 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. शेवटी कॅमेरुन ग्रीननं 20 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबाद संघासाठी उत्कृष्ट ठरला. त्यानं 3, तर टी नटराजननं 2 बळी घेतले. मयंक मार्कंडे आणि पॅट कमिन्स यांना 1-1 यश मिळालं.
आरसीबी तळाच्या स्थानी : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. त्यांनी मागील 6 सामने गमावले आहेत. आता हा सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीचा बंगळुरु संघ विजयी मार्गावर परतलाय. असं असूनही, आरसीबी गुणतालिकेत तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर कायम आहे. आरसीबीचा एकाही सामन्यात पराभव झाला तर संघ हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघानं 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 3 सामाने गमावले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा :