मुंबई 24 Runs in 3 Balls : 3 चेंडूत 24 धावा, तेही नो बॉल आणि वाईडशिवाय... अशक्य वाटतं ना, पण हे घडलं आहे. हा कारनामा अजून कोणी नव्हे तर खुद्ध क्रिकेटच्या देवानं म्हणजेच सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला आहे. आता तुम्ही म्हणाल की लीगल चेंडूवर जास्तीत जास्त 6 धावा करता येतात, मग असं काय घडलं की सचिन तेंडुलकरनं 3 चेंडूत 24 धावा काढल्या म्हणजेच प्रत्येक चेंडूवर 7.1 धावांच्या सरासरीनं. मनाला ताण देऊ नका. हे कसं शक्य झालं ते जाणून घेऊया.
सचिननं 4 डिसेंबर 2002 रोजी क्राइस्टचर्च इथं खेळळी ऐतिहासिक खेळी :
वास्तविक, 2002/03 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात सचिननं हा पराक्रम केला होता. या सामन्यातील सचिनची खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात धोकादायक खेळींमध्ये गणली जाते. खुद्द सचिनही त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम खेळी असल्याचं मानतो. हा सामना 4 डिसेंबर 2002 रोजी क्राइस्टचर्च मैदानावर खेळला गेला आणि त्यानं अवघ्या 27 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केली.
सामन्याचं नाव होतं 'क्रिकेट मॅक्स इंटरनॅशनल' :
या दौऱ्यावर, आयसीसीनं एकदिवसीय सामना प्रत्येकी 10-10 षटकांच्या 2-2 डावांमध्ये विभागून एक प्रयोग म्हणून पाहिले. प्रत्येक संघातील खेळाडूंची संख्याही 11 ऐवजी 12 ठेवण्यात आली होती. या सामन्याला 'क्रिकेट मॅक्स इंटरनॅशनल' असं नाव देण्यात आलं. या सामन्यात गोलंदाजाच्या पाठीमागील पडद्यासमोरील (साईट स्क्रिन) भागाला 'मॅक्स झोन' म्हणून घोषित करण्यात आलं. या झोनमध्ये फटके मारणाऱ्यांना दुहेरी धावा मिळायच्या, म्हणजे एखाद्यानं चौकार मारला तर त्याला 4 ऐवजी 8 धावा मिळतात आणि जर त्यानं षटकार मारला तर त्याला 6 ऐवजी 12 धावा मिळाल्या.
सचिननं केल्या 3 चेंडूत 24 धावा :
या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडनं 10 षटकांत 5 विकेट गमावत 123 धावा केल्या. आता भारताची पाळी आली. यात सलामीला आलेल्या या मास्टर ब्लास्टरनं 1994 मध्ये याच मैदानावर पहिल्यांदा भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून केवळ 49 धावांत 82 धावा करुन क्राइस्टचर्चमध्येही असंच वादळ निर्माण केलं होतं.
3 चेंडूत अनुक्रमे केल्या 8, 12 आणि 4 धावा :
या सामन्यात सचिननं अवघ्या 27 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी खेळली आणि यादरम्यान त्यानं फटक्यांवर उत्कृष्ट नियंत्रण दाखवलं. जेव्हा त्यानं 'मॅक्स झोन'मध्ये लागोपाठ तीन चेंडू मारुन सर्वांना चकित केलं. सचिनने या 3 चेंडूंवर एक चौकार, एक षटकार आणि 2 धावा केल्या. परंतु नियमानुसार त्याला अनुक्रमे 8, 12 आणि 4 धावा मिळाल्या. अशा प्रकारे, सलग 3 कायदेशीर चेंडूंवर 24 धावा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
सचिनची आक्रमक खेळी तरीही भारताचा पराभव :
सचिनच्या झंझावाती खेळीनंतरही भारतीय संघाला सामना 21 धावांनी गमवावा लागला. किवी संघाच्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 123 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानं सचिनच्या खेळीच्या जोरावर 5 बाद 133 धावा केल्या. दुसऱ्या डावात न्यूझीलंडनं 7 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या. पण भारतीय संघानं विजयासाठी 109 धावांच्या लक्ष्यासमोर 6 गड्यांच्या मोबदल्यात 87 धावा करुन सामना गमावला.
हेही वाचा :