बंगळुरु IPL 2024 RCB vs LSG : केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (LSG) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात चांगलीच चमक दाखवलीय. या मोसमात त्यांनी आतापर्यंतचा तीनपैकी दुसरा सामना जिंकलाय. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौनं 28 धावांनी शानदार विजय मिळवला.
आरसीबीच्या फलंदाजांची निराशा : या सामन्यात आरसीबीसमोर 182 धावांचं लक्ष्य होते. त्याच्या प्रत्युत्तरात संघ 153 धावांवरच मर्यादित राहिला. त्यांना सामना गमवावा लागला. आरसीबी या मोसमात ऑलआऊट होणारा पहिला संघही ठरलाय. आरसीबीकडून महिपाल लोमरनं सर्वाधिक 13 चेंडूत 33 धावांची शानदार खेळी केली. तर आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या रजत पाटीदारनंही 29 धावा केल्या. पण दोघांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
पुन्हा एकदा मयंक यादवच्या वेगाचा कहर : मागील सामन्याचा हिरो ठरलेल्या मयंक यादवनं या सामन्यातही पुन्हा एकदा आपल्या वेगाची जादू दाखवत 3 बळी घेतले. तर नवीन उल हकला 2 बळी मिळाले. याशिवाय मार्कस स्टॉइनिस, यश ठाकूर आणि एम सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अशाप्रकारे लखनौनं गोलंदाजांच्या जोरावर या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला.
डी कॉक-पूरन यांची शानदार खेळी : गोलंदाजांपुर्वी स्टार यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकनं आक्रमक फलंदाजी करत 36 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानं 56 चेंडूत एकूण 81 धावा केल्या. या जोरावर लखनौ संघानं सामन्यात चांगली सुरुवात करत 5 विकेट गमावत 181 धावा केल्या. डी कॉकशिवाय निकोलस पूरननंही नाबाद 40, मार्कस स्टॉइनिसनं 24 आणि केएल राहुलनं 20 धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलनं 2 बळी घेतले. तर रीस टॉपली, यश दयाल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
लखनौचा तीन सामन्यात दुसरा विजय : फॅफ डु प्लेसिसच्या आरसीबीचा हा चौथा सामना होता. यात त्यांनी आतापर्यंत फक्त 1 सामना जिंकलाय. यात त्यांनी पंजाब किंग्जचा पराभव केलाय. तर चेन्नई, कोलकाता आणि आता लखनौविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागलाय. दुसरीकडे, या मोसमातील लखनौ संघाचा हा केवळ तिसरा सामना होता. आतापर्यंत या संघानं 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. लखनौनं आधी पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव केला. आता बंगळुरुला पराभूत केलं. तर लखनौला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा :