चंदीगड IPL 2024 PBKS vs MI : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (MI) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये तिसरा विजय नोंदवलाय. त्यांनी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा (PBKS) 9 धावांनी पराभव केलाय. पंजाबचा हा सलग तिसरा पराभव ठरलाय.
पंजाबचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ : चंदीगडच्या मल्लनपूर इथं झालेल्या या सामन्यात मुंबई संघानं पंजाबला 193 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज 183 धावाच करु शकला आणि सामना गमावावा लागला. पंजाबकडून आशुतोष शर्मानं 28 चेंडूत सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर शशांक सिंगनंही 25 चेंडूत 41 धावा केल्या. या दोघांशिवाय पंजाब संघाच्या एकाही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गिराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर आकाश मधवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
गुणतालिकेत पंजाब-मुंबई बरोबरीवर : या सामन्यापूर्वी पंजाब आणि मुंबई गुणतालिकेत जवळपास बरोबरीवर होते. आता मुंबई संघानं 7 पैकी 3 सामने जिंकून 9व्या स्थानावरुन 7व्या स्थानावर झेप घेतलीय. दुसरीकडं, पंजाब संघाचा 7 सामन्यातील हा 5वा पराभव आहे. हा संघ आता 9व्या क्रमांकावर पोहोचलाय. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. तो अजून बरा झालेला नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी सॅम कुरन कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. गब्बरच्या अनुपस्थितीत करण पंजाब संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
सूर्यानं 34 चेंडूत अर्धशतक ठोकलं, तिलकही चमकलं : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं 7 गडी गमावून 192 धावा केल्या. मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादवनं 34 चेंडूत अर्धशतक केलं. त्यानं 53 चेंडूत एकूण 78 धावा केल्या. तर तिलक वंर्मानं 18 चेंडूत 34 धावा केल्या. रोहित शर्मानं 36 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून हर्षल पटेलनं 3 आणि सॅम कुरननं 2 बळी घेतले. तर कागिसो रबाडाला 1 विकेट मिळाली.
हेही वाचा :