मुंबई First Test Match Win In England : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 24 ऑगस्ट हा दिवस अतिशय खास आहे. कारण 53 वर्षांपूर्वी म्हणजे 1971 साली याच दिवशी भारतीय क्रिकेट संघानं इंग्लिश भूमीवर इतिहास रचला होता. तेव्हा भारतानं ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव केला, जो इंग्रजांच्या भूमीवर त्यांच्यावर मिळवलेला पहिला कसोटी विजय होता. या ऐतिहासिक विजयासोबतच भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पहिलाच मालिका विजय मिळवण्यातही यशस्वी ठरला होता.
मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित : या सामन्याआधी भारतानं इंग्लंडमध्ये 21 कसोटी सामने खेळले होते. त्यापैकी 15 सामने हरले होते आणि 6 सामने अनिर्णित राहिले होते. भारतानं 1971 मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला होता. त्या संघात गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप सरदेसाई असे ज्येष्ठ फलंदाज होते. या संघात सुनील गावस्कर यांचाही समावेश होता, ज्यांचा हा केवळ दुसरा परदेश दौरा होता. त्या दौऱ्यात भारताच्या फिरकी त्रिकुटात बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन नायक म्हणून उदयास आले होते. या मालिकेतील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला होता, जो अनिर्णित राहिला होता. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत भारत पावसानं वाचला. खरं तर, त्या कसोटीच्या चौथ्या दिवशी, 420 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतानं अवघ्या 65 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर पाऊस आला आणि पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर भारतीय संघ शेवटच्या कसोटीसाठी ओव्हलवर पोहोचला.
फिरकीच्या जाळ्यात अडकला होता इंग्लंड : ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात भारतीय संघ 284 धावांत सर्वबाद झाला आणि यजमान इंग्लंडला 71 धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन केलं. भागवत चंद्रशेखरची फिरकी अशी होती की इंग्लंडचा दुसरा डाव 101 धावांवर आटोपला. चंद्रशेखरनं 38 धावांत 6 बळी घेतले. यानंतर भारतानं 173 धावांचं लक्ष्य 6 गडी गमावून यशस्वीपणे पूर्ण केले. यासह भारतानं ओव्हल कसोटी 4 गडी राखून जिंकत इतिहास रचला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला हा ऐतिहासिक विजय मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या त्या मालिकेत भारतीय कर्णधार अजित वाडेकरनं सर्वाधिक 204 धावा केल्या होत्या. तर भागवत चंद्रशेखर, एस. वेंकटराघवन आणि बिशनसिंग बेदी या फिरकी त्रिकुटानं अनुक्रमे 13, 13 आणि 11 बळी घेतले.
वाडेकरांनी कर्णधार म्हणून केला विक्रम : हे तेच अजित वाडेकर आहेत, ज्यांना जानेवारी 1971 मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी संघाची कमान देण्यात आली होती. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं त्याच वर्षी म्हणजेच एप्रिल 1971 मध्ये कॅरेबियन भूमीवर प्रथमच मालिका जिंकली. तेव्हा 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं वेस्ट इंडिजवर 1-0 असा संस्मरणीय विजय मिळवला होता. तसं पाहिलं तर अजित वाडेकर हे पहिले भारतीय कर्णधार होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग तीन कसोटी मालिका जिंकल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1971 साली वेस्ट इंडिजचा 1-0 (5) आणि इंग्लंडचा 1-0 (3) पराभव केला. त्यानंतर 1972-73 मध्ये वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं घरच्या मैदानावरही इंग्लंडचा 2-1 (5) असा पराभव केला. म्हणजेच वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतानं ब्रिटीशांवर दोनदा विजय मिळवला. तसंच वाडेकर हे पहिले कर्णधार होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली.
हेही वाचा :