World junior girls chess championship : नागपूरच्या 18 वर्षांच्या बुद्धीबळपटू दिव्या देशमुखनं गुरुवारी बल्गेरियाच्या बेलोस्लाव्ह क्रॅस्टेवाचा पराभव करून मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. दिव्यानं 11 फेऱ्यांच्या स्पर्धेत 10 गुणांसह निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलंय. अर्मेनियाची मरियम मकरतच्यान दुसऱ्या स्थानावर राहिली. दिव्यानं मरियमला अवघ्या अर्ध्या गुणानं मागं टाकलं. अखेरच्या फेरीत मरियमनं एकतर्फी लढतीत भारताच्या रक्षिता रवीचा पराभव करून तिच्या पदकांच्या अपेक्षांवर पाणी फिरविलं. अझरबैजानच्या अयान अल्लाहवेरदियेवानं रशियाच्या नॉर्मन सेनियाचा पराभव करत 8.5 गुणांसह कांस्यपदक पटकावलं.
15 वर्षांचा दुष्काळ संपवला : अंतिम फेरीत दिव्यानं बल्गेरियाच्या क्रस्तेवा बेलोस्लावाचा पराभव करून देशाचा 15 वर्षांचा विश्व ज्युनिअर विजेतेपदाचा दुष्काळ संपवलाय. दिव्याच्या आधी भारताच्या कोनेरू हम्पीनं 2001 मध्ये अथेन्स ग्रीसमध्ये, 2008 मध्ये भारताच्या हरिका द्रोणवल्लीनं आणि 2009 मध्ये सौम्या स्वामीनाथनं अर्जेंटिनामध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हापासून हे विजेतेपद भारतापासून दूर होतं. विश्व ज्युनिअर विजेतेपद पटकावणारी दिव्या चौथी भारतीय ठरली आहे.
- विजेतेपद पटकावल्यानंतर दिव्याची प्रतिक्रिया : ''मला वाटतं की गुजरात असोसिएशनने स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजित केली. खेळण्याचे ठिकाणे चांगली होती. हॉटेल्सदेखील चांगली होती. मला कोणतीही समस्या आली नाही. इथे अजून स्पर्धा आयोजित केल्या जातील. मी चांगली खेळले. मी माझ्या खेळावर समाधानी आहे.'' - दिव्या देशमुख
- कोण आहे दिव्या देशमुख? दिव्या देशमुख ही नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी झाला. दिव्या एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. तिच्याकडं आंतरराष्ट्रीय मास्टरची पदवी आहे. दिव्या देशमुख ही भारताची 2022 महिला बुद्धिबळ चॅम्पियन आणि 2023 आशियाई महिला बुद्धिबळ चॅम्पियन आहे.
प्रणव आनंद दहाव्या स्थानावर : खुल्या गटात भारताचा ग्रँडमास्टर प्रणव आनंद 7.5 गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. अखेरच्या फेरीत त्यानं अर्मेनियाच्या आर्सेन दावत्यानचा पराभव केला. आदित्य सावंत 11, तर अनुज श्रीवास्तव 12व्या स्थानावर राहिला. दिव्याची ‘लाइव्ह रेटिंग’ 2464 असून या कामगिरीनंतर ती जगातील आघाडीच्या 20 महिला बुद्धिबळपटूंच्या यादीत सहभागी झालीय.
हेही वाचा
- टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive
- पुसदच्या देव चौधरीनं सातासमुद्रापार रचला इतिहास! कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये 97 वर्षात रौप्य पदक मिळवून देणारा पहिला भारतीय - Comrades Marathon
- टी 20 विश्वचषक: भारतीय क्रिकेट संघाचा अमेरिकेवर धडाकेबाज विजय, अर्शदीप सिंगनं रचला इतिहास - IND vs USA