लखनऊ IPL 2024 LSG vs MI : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 48व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) नं मुंबई इंडियन्सचा (MI) चार गडी राखून पराभव केलाय. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईनं लखनऊला विजयासाठी 145 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी अखेरच्या षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा चालू मोसमातील 10 सामन्यांतील हा सातवा पराभव ठरलाय. तर दुसरीकडं लखनऊ सुपर जायंट्सचा 10 सामन्यांमधील हा सहावा विजय ठरला. लखनऊ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर मुंबई नवव्या क्रमांकावर आहे.
स्टॉइनिसची अष्टपैलू कामगिरी : लखनऊच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मार्कस स्टॉइनिसनं अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी करताना स्टॉइनिसनं 3 षटकात 19 धावा देत एक बळी घेतला. त्यानंतर फलंदाजी करताना त्यानं 45 चेंडूत 62 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. याशिवाय केएल राहुलनं 28 धावा, दीपक हुडानं 18 धावा आणि निकोलस पुरननं नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्यानं सर्वाधिक दोन बळी घेतले.
मुंबईची फलंदाजी अपयशी : तत्पुर्वी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं सात विकेट्सवर 144 धावा केल्या. मुंबईसाठी टीम डेव्हिडनं 18 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह नाबाद 35 धावा केल्या. नेहल वढेरानं 46 धावांची तर इशान किशननं 32 धावांची खेळी केली. वढेरानं 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर ईशाननं 36 चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. बर्थडे बॉय रोहित शर्मा मोठी खेळी करु शकला नाही आणि केवळ चार धावा करुन तो बाद झाला. लखनऊ सुपर जायंट्सकडून मोहसीन खाननं सर्वाधिक दोन बळी घेतले. तर मार्कस स्टॉइनिस, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई आणि मयांक यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा :