बेंगळुरु IPL 2024 RCB vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17व्या हंगामातील 52 व्या सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होत आहे. या सामन्यात गुजरातनं दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीनं 4 गडी राखून विजय मिळवलाय. यासह त्यांचं स्पर्धेतील आव्हानं जिवंत राहिलंय. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अवघ्या 23 चेंडूत 64 धावांचा तडाखा देत विजयाचा पाया रचला. मात्र त्यानंतर 25 धावांत आरसीबीनं सहा फलंदाज गमावल्यानं सामन्यात रंजकता निर्माण झाली होती. शेवटी दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी अभेद्य भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
गुजरातची ढिसाळ फलंदाजी : तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 147 धावांत गारद झाला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खाननं सर्वाधिक 37 धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर राहुल तेवतियानं 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
गुजरातच्या संघात दोन बदल : या सामन्यासाठी आरसीबीनं आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडं गुजरात टायटन्समध्ये दोन मोठे बदल झाले. मानव सुथारला पदार्पणाची संधी मिळाली. किरकोळ दुखापत झालेल्या साई किशोरच्या जागी सुथारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. तर अजमतुल्ला ओमरझाईच्या जागी आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल या सामन्यात खेळायला आला.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. यात गुजरात टायटन्सनं दोन सामने जिंकले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंही दोन सामने जिंकले. चालू मोसमात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. यापूर्वी 28 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. त्यात आरसीबीनं 9 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला होता.
गुजरात टायटन्सची प्लेइंग-11 : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची प्लेइंग-11 : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख, यश दयाल
हेही वाचा :