मुंबई MI Vs SRH IPL 2024 : वानखेडे मैदानावर आयपीएल 2024 चा हंगामातील 55 वा सामना सोमवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन सामन्यात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघानं मुंबई संघाला 174 धावांच्य लक्ष्य दिलं होतं. मात्र प्रत्युत्तर देताना मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं जोरदार फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांची पीसं काढली. त्यानं 51 चेंडूत 102 धावांची झंझावाती फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघानं हैदराबाद संघावर 17.2 षटकात सहज विजय मिळवला. सूर्यकुमार यादवला तिलक वर्मानं तितकीच मोलाची साथ दिली. तिलक वर्मानं 32 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीत सूर्यकुमार यादवनं तब्बल 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले.
हैदराबादनं दिलं 174 धावांचं लक्ष्य : नाणेफेक जिंकून मुंबई संघानं हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबाद संघावर हुकमत गाजवली. हैदराबाद संघाकडून हेडनं 48 धावा ठोकल्या, तर पॅट कमिन्सनं 35 धावांची खेळी करुन हैदराबाद संघाला 173 धावापर्यंतची मजल मारुन दिली. या सामन्यात हेडला दोन वेळा जीवदान मिळालं. मात्र जीवदान मिळाल्यानंतरीह मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश आलं. बुमराहनं अभिषेक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला, तर हैदराबाद संघाचे इतर फलंदाजही काही विशेष खेळ करू शकले नाही. पॅट कमिन्सनं अखेरच्या षटकात मोठे फटके मारल्यानं हैदराबादची धावसंख्या 173 धावांवर गेली. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू पियुष चावलानं प्रत्येकी तीन बळी मिळवले. तर वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अंशुल कंबोजनं प्रत्येकी एक बळी टिपला.
वानखेडेवर सूर्यानं ओकली आग : हैदराबाद संघानं दिलेल्या 174 धावांत्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात आला. यावेळी मुंबईचे सलमीचे फलंदाज इशान किशननं पहिल्याच दोन चेंडूवर दोन चौकार लगावले. तर रोहित शर्मानंही एक चौकार ठोकला. ही जोडी मैदानात जम बसवणार असं वाटत असतानाच यान्सनच्या गोलंदाजीवर इशान किशन 9 धावांवर असताना तंबूत परतला. यानंतर रोहित शर्माही 4 धावांवर कमिन्सचा शिकार ठरला. नमन धीरला 9 चेंडूत भोपळाही फोटडा आला नाही. मुंबईचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवनं खेळाची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्यानं हैदराबादच्या गोलंदाजांची पीस काढत 51 चेंडूत 102 धावा ठोकल्या. त्याला तिलक वर्मानं तितकीच महत्वपूर्ण साथ दिली. सूर्यकुमार यादवनं षटकार खेचत मुंबईचा विजय आणि आपलं शतक पूर्ण केलं.
दोन्ही प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.