मुंबई IPL 2024 MI vs RR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (MI) ची राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध लढत होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभूत झालाय. आता त्याचा हा तिसरा सामना आहे. या हंगामात मुंबई पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांचा सामना करणं मुंबई इंडियन्ससाठी मोठे आव्हान असेल.
- हार्दिकवर असेल लक्ष : कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच मुंबईच्या घरच्या मैदानावर मुंबईत प्रेक्षकांचा सामना करणार आहे. मागील दोन सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर आता मुंबईच्या वानखेडे मैदानावर काय होतं हे पाहावं लागेल.
कर्णधार बदलल्यानं चाहते नाराज : मुंबईचा संघ आयपीएलमध्ये संथ सुरुवातीसाठी ओळखला जातो. पांड्या कर्णधार झाल्यानंतरही यात कोणताही बदल झालेला नाही. या हंगामात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं होतं. रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळं संघाच्या चाहत्यांची नाराजी होती. या अष्टपैलू खेळाडूला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या नाराजीचाही सामना करावा लागला.
विजयीमार्गावर परतण्याचा मुंबईचा प्रयत्न : पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून (GT) 6 धावांनी पराभव झाला होता. यानंतर हैदराबादमध्ये मोठ्या धावसंख्येच्या विक्रमासह झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं (SRH) मुंबईचा 32 धावांनी पराभव केला. या दोन पराभवानंतर मुंबई संघ सांघिक गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहे. जरी हा आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा प्रारंभिक टप्पा असला तरी मुंबई संघाला पराभवाची मालिका संपवायची आहे. दुखापतीतून सावरत असलेला अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवची मुंबईला उणीव भासत आहे.
मुंबईचं पारडं जड : गेल्या पाच सामन्यांमध्ये मुंबईचा संघ 4 विजयांची नोंद करण्यात यशस्वी ठरलाय. परंतु संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सनं या हंगामात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघानं आपले दोन्ही सामने जिंकले असून या काळात त्यांच्या बहुतांश खेळाडूंची कामगिरी चांगली राहिलीय. मुंबईला रोहितकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तर चाहत्यांना मैदानावर पांड्याकडून चांगल्या निर्णयाची अपेक्षा असेल. पांड्यानं अद्याप वेगवान गोलंदाज बुमराहचा चांगल्या पद्धतीनं वापर केला नसल्याची टीका त्याच्यावर होत आहे.
दोन्ही संघ :
- मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डिवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, गिराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, ईशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरिओ शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, टिलक वर्मा, विष्णू विनोद, निहाल वाढेरा, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव.
- राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जॉस बटलर, कुलदीप सेन, कृणाल सिंग राठौर, नंद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रीयान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुबन दुबे, रोव्हमन पॉवेल, टॉम कोहेर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि तनुष कोटियन.
हेही वाचा :