मुंबई IPL 2024 MI vs LSG : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात 67वा सामना होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स सध्याच्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहे, तर लखनऊचा संघही जवळपास बाहेरच आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून स्पर्धेचा विजयी निरोप घेण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं कर्णधार राहुल आणि निकोलस पुरनच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर 214 धावांचा डोंगर उभारलाय.
दोन्ही संघात मोठे बदल : या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले. मुंबई इंडियन्सनं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिलीय. तर त्याच्या जागी अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर या मोसमात पहिला सामना खेळणार आहे. तसंच डीवाल्ड ब्रेविस आणि रोमारियो शेफर्ड यांनाही संधी मिळालीय. तर दुसरीकडं, लखनऊचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक या सामन्यातून बाहेर राहिला, तर सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि वेगवान गोलंदाज मॅट हेन्री यांना संधी मिळालीय.
लखनऊचं पारडं जड : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पाच सामने खेळले गेले आहेत. यात लखनऊ सुपर जायंट्सनं चार सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सनं एक सामना जिंकला. चालू हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 30 एप्रिल रोजी दोघांमध्ये सामना झाला होता, ज्यात लखनऊनं 4 विकेट्सनं विजय मिळवला होता.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 : इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग 11 : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पुरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
हेही वाचा :