नवी दिल्ली Indian Paralympic Committee : क्रीडा मंत्रालयानं भारतीय पॅरालिम्पिक समिती (PCI) ला निलंबित केलंय. या निलंबनामागे अनेक कारणं देण्यात आली आहेत. त्यात समितीच्या निवडणुकीतील अनियमितता आणि क्रीडा निर्देशांचं उल्लंघन यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
काय म्हणलं क्रिडा मंत्रालय : यावर क्रीडा मंत्रालयानं सांगितलं की, पीसीआय च्या शेवटच्या निवडणुका सप्टेंबर 2019 मध्ये झाल्या होत्या. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयानं WP क्रमांक 10647/2019 मध्ये दिलेल्या आदेशामुळं निवडणुकीच्या अधिसूचनेला 3 सप्टेंबर 2019 रोजी स्थगिती देण्यात आली होती. तसंच निवडणूक निकाल जाहीर करण्यास रिटर्निंग ऑफिसरला मज्जाव करण्यात आला. अशा स्थितीत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले नाहीत.
पीसीआयकडून परिपत्रकाचं उल्लंघन : पीसीआय कार्यकारी समितीचा कार्यकाळ 31 जानेवारी 2024 रोजी संपणार होता. यानंतर नवीन कार्यकारिणीच्या निवडणुका 28 मार्च 2024 रोजी होणार आहेत. म्हणजेच मागील कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास दोन महिन्यांच्या अंतरानं निवडणुका होणार आहेत. हा विलंब पीसीआयच्या स्वतःच्या घटनेतील तरतुदी आणि क्रीडा निर्देशांचं उल्लंघन करणारा आहे. 2015 मध्ये क्रीडा मंत्रालयानं एक परिपत्रक जारी करुन सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (NSF) त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी किमान एक महिना आधी नवीन पदाधिकाऱ्यांसाठी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र पीसीआय या परिपत्रकाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप क्रीडा मंत्रालयानं केलाय.
- कशी असावी निवडणूक प्रकिया : पीसीआयच्या स्वतःच्या घटनेत दर चार वर्षांनी गव्हर्निंग बॉडी सदस्यांच्या निवडीबद्दल देखील सांगितलंय. तसंच ही निवडणूक प्रक्रिया भारत सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 (NSDC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असावी, असंही स्पष्ट केलंय.
हेही वाचा :