मोकी (चीन) India vs South Korea 2nd Semifinal : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना भारतीय पुरुष हॉकी संघ आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतानं जागतिक क्रमवारीत 14व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांच्या सामना शेजारी चीनसोबत होणार आहे. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना यजमान चीन संघाशी होणार आहे, ज्यांनी पाकिस्तानला पराभूत करुन प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
भारताचे चार गोल : दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताकडून उत्तम सिंग (13वं मिनिट), हरमनप्रीत सिंग (19वं, 45वं मिनिट), जर्मनप्रीत सिंग (32वं मिनिट) यांनी गोल केले. त्याचवेळी दक्षिण कोरियासाठी यांग जिहुननं (33वं मिनिट) एकमेव गोल केला. परिणामी भारतानं दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत स्पर्धेतील विजयी मोहीम कायम ठेवली.
भारताची वेगवान सुरुवात : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गतविजेत्या भारतानं सामन्याची सुरुवात आक्रमक शैलीत केली. भारतानं कोरियावर अनेक आक्रमक खेळ केले, परंतु कोरियाच्या बचावफळीनं चमकदार कामगिरी केली. पण, 13व्या मिनिटाला भारताचा स्टार खेळाडू उत्तम सिंगनं कोरियाचा किल्ला तोडला आणि अप्रतिम मैदानी गोल करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरापर्यंत भारताची 2-0 आघाडी : दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतानं आपला उत्कृष्ट खेळ सुरु ठेवला. 19व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं गोलपोस्टमध्ये न टाकण्याची किंचितही चूक केली नाही. या दरम्यान कोरियन संघाला अनेक सोप्या संधी मिळाल्या, मात्र गोल करण्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधारानं केलेल्या शानदार गोलमुळं भारतानं हाफ टाइमपर्यंत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
तिसरा क्वार्टरही रोमांचक : भारत आणि कोरिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्याचा तिसरा क्वार्टर खूपच रोमांचक झाला. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. भारतीय संघाचा स्टार खेळाडू जर्मनप्रीत सिंगनं 32व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली. पण, पुढच्याच मिनिटाला कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर यांग जिहुननं चमकदार कामगिरी करत फरक कमी केला. 45व्या मिनिटाला कोरियाच्या गोलरक्षकाला 'यलो कार्ड' देण्यात आलं आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर भारताचा 'सरपंच' हरमनप्रीत सिंगनं शानदार गोल करत भारताला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली.
हेही वाचा :