नवी दिल्ली Cricketer Shikhar Dhawan Announces Retirement : क्रिकेटचा गब्बर, मिशांना ताव मारणारा खेळाडू म्हणून शिखर धवनची जगभर ओळख आहे. आता याच 'गब्बर'नं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. शनिवारी सकाळीच धवननं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं याबाबतचा एक व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेयर केला.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
चाहत्यांचे मानले आभार : "मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत असताना, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता बाळगतो. चाहत्यांनी खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. त्यामुळं नाव झालं आणि प्रसिद्धीही मिळाली. त्यामुळं तुम्हा सर्वांना धन्यवाद!" अशा शब्दात शिखऱ धवननं देशवासियांचे आभार मानले. तसंच त्यानं कोचचेही यावेळी आभार मानले.
शिखर धवननं शेयर केला व्हिडिओ : सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करत शिखर धवननं सर्व चाहत्यांचे आभार मानत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. "मी माझ्या संघाचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्यासोबत मी इतके दिवस क्रिकेट खेळलो. संघ हे माझ्यासाठी दुसरं कुटुंबच होतं. सर्व चाहत्यांकडून मला प्रसिद्धी आणि प्रेम मिळालं. एक म्हण आहे की, संपूर्ण कथा वाचण्यासाठी पानं उलटावे लागतात. मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे," असं म्हणत शिखर धवननं भावनिक व्हिडिओ बनवला व तो शेयर करत निवृत्ती जाहीर केली.
'गब्बर'मुळं भरायची धडकी : डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. मात्र, त्यानंतर त्याची जागा शुभमन गिलनं घेतली. भारताचा 'गब्बर' खेळाडू अशी शिखर धवनची ओळख होती. शिखर धवन खेळायचा ग्राऊंडवर आला की विरोधी टीमच्या बॉलर्सला धडकी भरायची. मोठा फटकार मारला की मिशांवर ताव मारताना आपण अनेकवेळा शिखर धवनला पाहिलंय.
शिखर धवन किती सामने खेळला? :
- कसोटी - 34
- एकदिवसीय - 167
- टी-20 - 68
शिखर धवनचा क्रिकेटमधील प्रवास : शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच भारतीय संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता. देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. त्यानं भारतीय संघाकडून 2010 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी केली होती. त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. आयपीएलमध्येही त्यानं शानदार कामगिरी केली होती. तो पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार राहिलेला आहे.