INDIA vs PAKISTAN Match Preview : टी20 विश्वचषकाचे सामने जगभरामध्ये सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज 9 जून (रविवार) रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत-पाकिस्तानचेच क्रिकेट चाहतेच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. टी-20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना आज रोजी होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा आहे. तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यानिमित्तानं दोन्ही संघाची एकमेकांसमोर टी-20 फॉर्मेटमध्ये आकडेवारी कशी राहिलीय? हे जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. या काळात भारतीय संघाचा वरचष्मा राहिलाय. भारतीय संघानं 12 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. पाकिस्ताननं 12 टी-20 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. तर 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिलाय. भारतानं 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं फक्त 2 सामने जिंकले आहेत.
भारताच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा : भारतीय संघाकडून सर्वांच्या नजरा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असणार आहेत. कर्णधार रोहितनं आयर्लंडविरुद्ध 52 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर ऋषभ पंतनं नाबाद 36 धावांची खेळी केली होती. या सामन्यात विराट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्यानं आयर्लंडविरुद्ध चेंडूच्या जोरावर 3 बळी घेतले होते. याशिवाय बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यातही त्यानं 40 धावांची तुफानी खेळी केली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चमकदार कामगिरी करत आहे. त्यानं आयर्लंडविरुद्ध अवघ्या 1 षटकात 2 बळी घेतले. त्यामुळं या सामन्यात हे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
पाकिस्तानच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा : पाकिस्तान भारतीय संघाकडून सर्वांच्या नजरा बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर यांच्यावर असेल. यूएसकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला होता. बाबरनं गेल्या सामन्यात 44 धावांची खेळी केली होती. मात्र मोहम्मद रिझवान फ्लॉप ठरला. शाहीन आफ्रिदीला गोलंदाजीत एकही विकेट मिळाली नाही. पण मोहम्मद आमिरनं 1 विकेट आपल्या नावावर केली. गेल्या सामन्यात या खेळाडूंची कामगिरी खराब झाली असली तरी भारताविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील.
खेळपट्टीचा अहवाल : न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त कमी धावसंख्येचे सामनेच पाहायला मिळालेत. या खेळपट्टीवर आतापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी एका सामन्यात आयर्लंडला भारताविरुद्ध 96 धावांवर रोखण्यात आलं. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला कॅनडाविरुद्ध केवळ 125 धावा करता आल्या. या मैदानावर दोन्ही डावांत प्रथम फलंदाजी करताना संघांना कमी धावा करता आल्या. त्यामुळं या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारणं फार कठीण जाईल.
- हवामान अंदाज : न्यू यॉर्क शहरामध्ये रविवारी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान 26 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग सुमारे 22 किमी/तास असण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघ
- भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), हरिस रौफ, मोहम्मद अमीर, नसीम शाह, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी.
हेही वाचा