नवी दिल्ली IND vs NEP U19 World Cup : शुक्रवारी (2 फेब्रुवारी) भारत आणि नेपाळ यांच्यात झालेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या सामन्यात भारतानं 132 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 6 गडी गमावून 297 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळला 50 षटकात केवळ 165 धावाच करता आल्या. भारताकडून सौम्य पांडेनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर कर्णधार साहरान आणि सचिन दास यांनी शानदार फलंदाजी करत शतकी खेळी खेळली. शतकी खेळीसाठी सचिनला 'सामनावीर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
भारताचा पहिला डाव 297/5 : प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी कर्णधार उदय साहरान आणि सचिन दास यांनी शतकी खेळी खेळली. सचिन दासनं 101 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं 116 धावा केल्या. तर उदय साहराननं 107 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीनं 100 धावा केल्या. आदर्श सिंगनं 18 चेंडूत 21 धावा केल्या. तर प्रियांशू माउलिया 36 चेंडूत 19 धावा करून धावबाद झाला. सलामीवीर अर्शीन कुलकर्णी यानं 30 चेंडूत 18 धावा केल्या. नेपाळच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, गुलशन झा यानं 3 बळी घेतले. याशिवाय आकाश चंदनं 9 षटकात 65 धावा देत 1 बळी घेतला.
नेपाळचा दुसरा डाव 165/9 : भारताच्या 297 धावांना प्रत्युत्तर देताना नेपाळच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. दीपक बोहरा आणि अर्जुन कमल यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. मात्र ही भागीदारी आणखी मोठी होऊ शकली नाही. नेपाळची पहिली विकेट 14 व्या षटकात पडली. दीपक बोहरा 42 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. यानंतर उत्तम थापाही 8 धावा करून बाद झाला. अर्जुन कमलनं 64 चेंडूत 26 धावांची खेळी केली. कर्णधार देव कमल 42 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.
भारताची गोलंदाजी : भारतीय गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, वेगवान गोलंदाज सौम्य पांडेनं 8 षटकात 20 धावा देऊन 3 बळी घेतले. अष्टपैलू अर्शीन कुलकर्णीनंही चार षटकांत 18 धावा देत 2 बळी घेतले. तर राज लिंबानी, अभिषेक आणि आराध्या शुक्ला यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हे वाचलंत का :