धर्मशाला IND vs ENG Test Match : धर्मशाळा इथं सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 1 बाद 135 धावा आहे. पहिल्या डावात भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागं. भारतीय कर्णधार 52 तर शुभमन गिल 26 धावा करुन नाबाद आहेत. यशस्वी जैस्वाल 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं शानदार अर्धशतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली, मात्र दिवस संपताना शोएब बशीरनं त्याला 57 धावांवर बाद केलं.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची आक्रमक सुरुवात : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ अवघ्या 218 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघानं आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालनं 58 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या चेंडूवर बेन फॉक्सनं यशस्वी जैस्वालला यष्टिचित केलं. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानंही आपलं अर्धशतक पुर्ण केलं.
जॅक क्रॉलीचं अर्धशतक : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेले इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर सातत्यानं विकेट पडत गेल्या. विशेषत: इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडे भारतीय फिरकीपटूंच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. 175 धावांवर चौथी विकेट गमावलेला इंग्लिश संघ 218 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून जॅक क्रॉलीनं सर्वाधिक 79 धावांची चांगली खेळी केली, पण बाकीच्या फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही.
भारतीय फिरकीपटूंसमोर बेन स्टोक्सचा संघ विस्कळीत : भारतीय संघाकडून कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या चायनामन गोलंदाजानं 5 इंग्लिश फलंदाजांना बाद केलं. रवी अश्विननंही आपल्या 100 व्या कसोटीत 4 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला 1 बळी मिळाला. आता भारतीय संघ दुसऱ्या दिवशी 1 बाद 124 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करेल. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 3-1 नं आघाडीवर आहे. भारताला पाचवी कसोटी जिंकून मालिका 4-1 नं जिंकायची आहे. तर इंग्लिश संघ शेवटची कसोटी जिंकून आपला सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा :