हैदराबाद IND vs ENG Test 3rd Day : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 436 धावांवर सर्वबाद झालाय. अष्टपैलू रवींद्र जडेजानं संघासाठी 87 धावांची सर्वात मोठी खेळी केली. याशिवाय के एल राहुलनं 86 आणि यशस्वी जैस्वालनं 80 धावा केल्या. पहिल्या डावानंतर भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध 190 धावांची आघाडी घेतलीय.
जो रुटनं घेतले चार बळी : भारतीय संघ तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत असताना भारतानं 421/7 धावसंख्येसह तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. मात्र दिवसाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही षटकांचा खेळ झाल्यावर जो रुटनं शतकाकडं वाटचाल करणाऱ्या रवींद्र जडेजाला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्यानं फलंदाजीसाठी आलेल्या जसप्रीत बुमराहला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर पुढच्याच षटकात रेहान अहमदनं अक्षर पटेलला बोल्ड करुन भारताची शेवटची विकेट घेतली. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी अवघ्या 15 धावा करता आल्या आणि यादरम्यान त्यांनी तीन विकेट गमावल्या. इंग्लिश फिरकीपटूंनी भारताला तिन्ही धक्के दिले. इंग्लंडकडून पार्टटाईम फिरकीपटू जो रुटने डावात सर्वाधिक 4 बळी घेतले.
दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिला धक्का : भारतीय संघाच्या 190 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना इंग्लंडनं सावध सुरुवात केली होती. मात्र डावाच्या 10व्या षटकात फिरकीपटू आर आश्विननं झॅक क्रॅवलीला (31) आपल्या जाळ्यात अडकवत साहेबांना पहिला धक्का दिलाय. सध्या इंग्लंडच्या 10 षटकांत 49/1 धावा झाल्या असून बेन डकेट (14) आणि ओली पोप (4) खेळत आहेत.
हेही वाचा :
- काय सांगता! 147 चेंडूत 300 धावा; हैदराबादच्या तन्मयनं रचला इतिहास, ब्रायन लाराचा 'हा' विक्रमही धोक्यात
- 'यशस्वी' सुरुवातीनंतर भारताला दुसऱ्या दिवशी दोन धक्के; मात्र भारतीय संघ मजबूत स्थितीत
- मुशीर खानच्या तुफानी खेळीनं भारताचा आयर्लंडवर 201 धावांनी विजय
- राहुल, जडेजानं ठोकलं शानदार अर्धशतक, टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर