राजकोट IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून राजकोट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात काही बदलांसह मैदानात उतरणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडचा संघ यापूर्वी सामना खेळलाय. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. अशातच तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
भारतीय संघात दोघांचं पदार्पण निश्चित : भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर व्यवस्थापन या सामन्यातून सरफराज खान आणि ध्रुव जुरेलचं कसोटी पदार्पण करु शकतात. के एल राहुलची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्यानं सरफराज खानचं कसोटी पदार्पण जवळपास निश्चित झालंय. त्याचवेळी, यष्टिरक्षक के एस भरतनं हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटीत चांगली कामगिरी न केल्यामुळं ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. तसंच, भारतीय संघ रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो.
साहेबांकडून अंतिम संघाची घोषणा : दुसरीकडं राजकोट कसोटीसाठी इंग्लंडनं आपला संघ घोषित केलाय. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघानं आपल्या अंतिम एकादशमध्ये बदल केलाय. फिरकीपटू शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलंय. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं आपल्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम संघाची घोषणा केलीय. या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मार्क वुडला संधी देण्यात आल्याचं बोर्डानं सांगितलंय. वुडच्या पुनरागमनामुळं शोएब बशीरला वगळण्यात आलंय. तसंच कर्णधार बेन स्टोक्स राजकोटमध्ये कसोटी कारकिर्दीतील त्याचा 100 वा सामना खेळणार असल्याची माहितीही बोर्डानं दिलीय.
- इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टिरक्षक), रिहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन
- भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
हेही वाचा :