राजकोट IND vs ENG 3rd Test : राजकोट इथं सुरू तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 5 बाद 326 आहे. भारताकडून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव नाबाद परतले आहेत. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
खराब सुरुवातीनंतर भारतीय संघाचा डाव सावरला : प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 10 धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 22 धावा होती. शुभमन गिल मार्क वुडच्या चेंडूवर एकही धाव न काढता तंबूत परतला. रजत पाटीदारही काही विशेष करु शकला नाही. रजत पाटीदार 5 धावा करुन टॉम हार्टलीचा बळी ठरला. भारताचे टॉप-3 फलंदाज 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र, यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं जबाबदारी स्वीकारली. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यात चौथ्या विकेटसाठी 204 धावांची मोठी भागीदारी झाली. या भागीदारीमुळं भारतीय संघ अडचणीतून बाहेर पडला. रोहित शर्मानंतर जडेजानंही शानदार शतक झळकावलं.
रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाचं शानदार शतक : कर्णधार रोहित शर्मा 196 चेंडूत 131 धावा करून बाद झाला. भारतीय कर्णधाराला मार्क वुडनं बाद केलं. यानंतर सरफराज खाननं पदार्पणाच्या कसोटीत अवघ्या 66 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारला. सरफराज खान शानदार खेळी करुन धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा 212 चेंडूत 110 धावा करुन नाबाद परतला.
इंग्लिश गोलंदाजांची कामगिरी कशी : इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. मार्क वुडनं 17 षटकांत 69 धावा देत 3 भारतीय फलंदाजांचं बळी घेतले. याशिवाय टॉम हार्टलीला 1 बळी मिळवण्यात यश आलंय. तर जेम्स अँडरसनशिवाय जो रुट आणि रिहान अहमद यांना एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा :