नवी दिल्ली IND vs BAN Test Series : बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी तयारी सुरु केली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई इथं होणार असून भारतीय संघाचे खेळाडू चेपॉक मैदानावर सराव करत आहेत. भारतीय क्रिकेट संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण बांगलादेशला हरवून एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी : भारतानं बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यास हा मोठा विक्रम ठरेल. 1932 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतानं एकूण 579 सामने खेळले आहेत. यात 178 सामने जिंकले तर 178 सामने हरले. उर्वरित 223 सामन्यांपैकी 222 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना रद्द झाला.
विक्रमी कामगिरी करणारा पाचवा संघ ठरणार : 19 सप्टेंबरपासून चेन्नई इथं होणारी बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी भारतानं जिंकली तर कसोटी क्रिकेटमध्ये पराभवापेक्षा जास्त विजय नोंदवणारा भारत पाचवा संघ ठरेल. भारताला आतापर्यंत या विक्रमाला स्पर्श करता आलेला नाही. जर त्यांनी हा टप्पा गाठला तर 1932 नंतर म्हणजे 92 वर्षांनंतर पहिल्यांदाच संघ कसोटीत पराभवापेक्षा जास्त सामने जिंकेल. सध्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार संघांनी पराभवापेक्षा जास्त विजय मिळवला आहे.
जे संघ कसोटीत पराभूत होण्यापेक्षा जास्त सामने जिंकले
- ऑस्ट्रेलियानं 866 कसोटी सामने खेळले आहेत, त्यात 414 जिंकले आहेत आणि 232 गमावले, ते पहिल्या स्थानावर आहेत.
- इंग्लंडनं 1077 कसोटी सामने खेळले त्यात 397 विजय आणि 325 पराभवांसह ते दुसऱ्या स्थानावर आहे.
- दक्षिण आफ्रिकेनं 466 कसोटी सामने खेळले आहेत, यात 179 सामने जिंकले आहेत आणि 161 सामने गमावले, ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
- पाकिस्ताननं 458 कसोटी सामन्यांपैकी 148 जिंकले आहेत आणि 144 गमावले आहेत. ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा :