T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरुवात झालीय. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये चाहत्यांना स्फोटक थरार पाहायला मिळालाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली होत असलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ खेळत आहेत. दरम्यान, आयसीसीनं या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमही जाहीर केलीय. यावेळी टी-20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ऐतिहासिक बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.
विश्वचषकात पैशांचा वर्षाव : 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीनं एकूण 11.25 दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम म्हणून देणारं आहे. यावेळी विजेत्या संघाला 2.45 दशलक्ष डॉलर्स दिले जातील. जे भारतीय रुपयाप्रमाणे सुमारे 20 कोटी रुपये आहेत. तर उपविजेत्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयाप्रमाणे 10.50 कोटी इतकी आहे. 2022 मध्ये जेतेपद पटकवलेल्या इंग्लंड संघाला 13 कोटी बक्षीसाची रक्कम मिळाली होती. तर 6.44 कोटी रुपये उपविजेत्या पाकिस्तान संघाला देण्यात आले होते.
पराभूत संघांनाही बक्षिसाची रक्कम मिळणार : उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांनाही यावेळी बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 6.55 कोटी रुपये दिले जातील. तर सुपर-8 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना 3.18 कोटी रुपये दिले जातील. दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.06 कोटी रुपये दिले जातील. याशिवाय सर्व संघांना 1.87 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सुपर-8 पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्याऱ्या संघाला 25.9 लाख रुपये मिळतील.
भारताचा सामना कधी : या स्पर्धेत टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. रोहितचा संघ 5 जूनपासून न्यू यॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर 9 जूनला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. टीम इंडिया या विश्वचषकात विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.
हेही वाचा
- ऑलराऊंडर केदार जाधवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर - Kedar Jadhav Retirement
- टी20 वर्ल्ड कप 2024 : वर्ल्डकपमध्ये रंगला सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा 'नायक' - T20 World Cup 2024
- विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; आयसीसीकडून मिळाला आणखी एक पुरस्कार - Virat Kohli Player of Year 2023