ब्यून्स आयर्स (अर्जेंटिना) 4 Wickets in 4 Balls : T20 क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणं नेहमीच कठीण मानलं जातं, कारण हा फॉरमॅट पूर्णपणे फलंदाजांचा खेळ मानला जातो. गोलंदाजांना संपूर्ण सामन्यात फक्त चार षटकं टाकायची असतात, म्हणजे 24 चेंडू. त्यात दुहेरी हॅट्ट्रिक (चार चेंडूत सलग चार विकेट्स) घेणं म्हणजे लोखंडी हरभरे चघळण्यासारखं आहे. आता अर्जेंटिनाच्या हर्नान फेनेलनं T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चार चेंडूत चार विकेट घेत इतिहासाच्या पानात आपलं नाव नोंदवलं आहे.
हर्नन फेनेलची शानदार गोलंदाजी : अर्जेंटिनाकडून खेळताना हर्नान फेनेलनं केमन आयर्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याचा संघ जिंकला नसला तरी आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला. त्यानं केमन आयलंड संघाविरुद्ध चार षटकात केवळ 15 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. तो बऱ्यापैकी किफायतशीर असल्याचं सिद्ध झालं.
A double hat-trick and a five-wicket haul!
— ICC (@ICC) December 16, 2024
A day to remember for Hernan Fennell in Americas #T20WorldCup qualifying 🇦🇷
More 👉 https://t.co/zIjpcvA2AB pic.twitter.com/Lja2JQDOcF
ठरला सहावा गोलंदाज : केमन आयलंड संघाविरुद्ध त्यानं शेवटचं षटक टाकलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा झाल्या. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. यानंतर पुढच्या चार चेंडूत त्यानं सलग चार विकेट घेतल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूत चार विकेट घेणारा तो केवळ सहावा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी राशिद खान, लसिथ मलिंगा, कुर्तिस कॅम्फर, जेसन होल्डर, वसीम याकुभार यांनी दुहेरी हॅट्ट्रिक घेतली आहे.
अर्जेंटिनाचा सामन्यात पराभव : ICC पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक अमेरिका पात्रता स्पर्धेत, केमन आयलंड संघ आणि अर्जेंटिना संघ यांच्यात सामना झाला, ज्यात केमन आयलंड संघानं 22 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात केमन आयलंडनं अर्जेंटिनाला विजयासाठी 117 धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात ते केवळ 94 धावांवर सर्वबाद झाले आणि पूर्ण 20 षटकंही खेळू शकले नाहीत.
हेही वाचा :