अहमदाबाद IPL 2024 GT vs MI : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा पाचवा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक होता. यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघानं 6 धावांनी विजय मिळवला. 169 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 9 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावाच करता आल्या. संघासाठी युवा खेळाडू डिवाल्ड ब्रेविसनं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली तर रोहित शर्मानंही 43 धावांची खेळी केली. टिलक वर्मानंही 25 धावांच योगदान दिलं. मात्र यांची खेळी संघाला विजय मिळुवन देऊ शकली नाही. विशेष म्हणजे मुंबईचा संघ सलग 12 व्यांदा हंगामातील पहिल्या सामन्यात पराभूत झालाय. त्यांनी 2012 च्या आयपीएलमध्ये आपला पहिला सामना जिंकून हंगामाची विजयी सुरुवात केली होती.
गुजरातची धारदार गोलंदाजी : गुजरात संघासाठी, फिरकीपटूंनी मधल्या षटकांत चांगली कामगिरी केली आणि ठराविक अंतरानं विकेट्स घेतल्या. शेवटी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन आणि उमेश यादव यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा पराभव केला. तिघांनीही 2-2 विकेट घेतल्या. यांच्याव्यातिरिक्त अजमतुल्ला उमरझाईनं 2 आणि साई किशोरनं 1 बळी घेतला. मुंबई संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती. त्यानंतर हार्दिक पांड्यानं उमेश यादवच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. मात्र त्यानंतर उमेशनं दमदार पुनरागमन केलं आणि पांड्यापाठोपाठ पीयूष चावलाला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करुन गुजरातला सामना जिंकून दिला.
सुदर्शन आणि गिल यांनी शानदार खेळी खेळली : या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघानं फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यावर आपल्या निर्धारित 20 षटकांत 6 विकेट्सवर 168 धावा केल्या. साई सुदर्शननं संघाकडून सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय गिलनं 31 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 14 धावांत 3 बळी घेतले. जेराल्ड कोएत्झीला 2 आणि पियुष चावलाला 1 बळी मिळाला. गुजरात संघानं 31 धावांवर पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहनं रिद्धिमान साहाला (19) क्लीन बोल्ड केलं. यानंतर 62 धावांवर शुभमन गिलच्या (31) रुपानं संघानं दुसरी विकेट गमावली. पियुष चावलानं त्याचा बळी घेतला. गुजरातनं 104 धावांवर उमरझाईच्या (17) रुपानं तिसरी विकेट गमावली. या सामन्यात गुजरात संघासाठी तीन खेळाडूंनी पदार्पण केलं. स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि उमेश यादव हे तीन खेळाडू होते. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता, ज्यात गुजरातनं विजयासह आपलं खातं उघडलं, तर मुंबईचा पराभव झाला.
हेही वाचा :