अनंतपूर Duleep Trophy 2024 Score : दुलीप ट्रॉफी 2024 च्या चौथ्या सामन्यात इंडिया बी संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरननं शानदार शतक झळकावलं. हा तोच अभिमन्यू ईश्वरन आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो आणि त्याची अनेक वेळा भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अभिमन्यू ईश्वरननं पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या संघात मुशीर खान, सरफराज खान, रिंकू सिंग आणि नितीश रेड्डीसारखे स्टार खेळाडू आहेत. या सगळ्यात त्यानं पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे.
अभिमन्यू ईश्वरननं झळकावलं 34 वं शतक : या सामन्यात इंडिया सी संघाविरुद्ध अभिमन्यू ईश्वरननं अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात इंडिया सी संघानं प्रथम फलंदाजी करताना 525 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत संघाला चांगली सुरुवात करण्याची गरज होती. यावेळी अभिमन्यू ईश्वरननं कर्णधारला साजेशी खेळी खेळली आहे. त्यानं 175 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. आजच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यानं 262 चेंडूत 143 नाबाद धावा केल्या होत्या. अभिमन्यू ईश्वरनचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे 34 वं शतक आहे. त्यानं अनेक प्रसंगी महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत, परंतु तो अजूनही भारतीय संघासाठी पदार्पणाची वाट पाहत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी : अभिमन्यू ईश्वरननं गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यानं 96 प्रथम श्रेणी सामने, 88 लिस्ट ए सामने आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यानं 47 पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 7000 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 29 अर्धशतकं आणि 24 शतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, लिस्ट ए मध्ये, त्यानं 47.49 च्या सरासरीनं आणि 9 शतकांच्या मदतीने 3847 धावा केल्या आहेत. T20 बद्दल बोलायचं झालं तर त्यानं 37.53 च्या सरासरीनं आणि 1 शतकाच्या मदतीनं 976 धावा केल्या आहेत. 2022 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर गेल्या वेळी त्याची भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली होती. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला.
हे स्टार फलंदाज फ्लॉप : अभिमन्यू ईश्वरनशिवाय संघातील अनेक स्टार फलंदाज फ्लॉप झाले. मुशीर खान 15 चेंडूत केवळ 1 धाव करु शकला, तर त्याचा भाऊ सरफराज खान 55 चेंडूत 16 धावा करुन बाद झाला. रिंकू सिंगसाठी पहिला डावही काही खास नव्हता, त्यानं 16 चेंडूत 6 धावा केल्यानंतर आपली विकेट गमावली. दुसरीकडं, नितीश रेड्डीही 11 चेंडूत 2 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा :