नवी दिल्ली Champions Trophy 2025 in Pakistan : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनासाठी सातत्यानं तयारी करत आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला निधीची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत, पैसे वाचवण्यासाठी, पीसीबीनं नवीन फ्लडलाइट्स विकत घेण्याऐवजी भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्लडलाइट्स घेण्यासाठी मागविल्या निविदा : चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला नवीन फ्लडलाइट्स बसवायचे आहेत. क्रिकेट बोर्ड त्याचं नियोजन करत आहे. मात्र पैसे वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं नवीन फ्लडलाइट्स खरेदी करण्याऐवजी त्यांना एका वर्षासाठी भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीनं कराची आणि लाहोरच्या मैदानांसाठी फ्लडलाइट्स एका वर्षासाठी भाड्यानं घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. याशिवाय कराची आणि लाहोरच्या मैदानात आधीच लावण्यात आलेले जुने फ्लड लाइट्स काढून क्वेटा आणि रावळपिंडीच्या स्टेडियममध्ये लावले जात असल्याची माहितीही स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
सोशल मीडियावर ट्रोल : एवढंच नाही तर पाकिस्तान बोर्डानं जनरेटर भाड्यानं घेण्याचीही ऑफर दिली आहे. पीसीबीनं कराची, लाहोर, रावळपिंडी, मुलतान, फैसलाबाद, अबोटाबाद, क्वेटा, पेशावर मैदानासाठी जनरेटर घेण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. तिथं लोडशेडिंगची समस्या वाढल्यानं सामन्यादरम्यान वीज खंडित होऊ नये यासाठी जनरेटरचा वापर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही स्थिती पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. जगातील टॉप 10 श्रीमंत क्रिकेट बोर्डांच्या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असला तरी नेटिझन्स या परिस्थितीसाठी ट्रोल करत आहेत. क्रिकेट बोर्डाकडे पैसे नाहीत, ते चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कसं करणार? असं एका यूजरनं लिहिलं.
हेही वाचा :
- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळणार? प्रशिक्षकांनीच दिलं आमंत्रण - Arshad Nadeem
- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवणार कसोटी सामना; समोर आलं मोठं कारण - Pakistan Cricket Team
- भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेत रचला गेला अनोखा 'विक्रम'; पहिल्यांदाच इतके खेळाडू 'अशा' पद्धतीनं झाले 'आउट' - IND vs SL ODI