नवी दिल्ली Team India Home Season : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेला टी 20 क्रिकेट विश्वचषक संपल्यावर भारतीय क्रिकेट संघ पुढील 5 महिने (सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत) घरच्या मैदानावर अनेक द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. त्यात बांगलादेश, न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंड विरुद्ध दोन हात करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) याबाबतचं संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर केलय.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनं होणार सुरुवात : या वेळापत्रकानुसार, भारतीय संघाला या कालावधीत 5 कसोटी, 8 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाच्या घरगुती सामन्यांची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनं होईल. यानंतर बांगलादेशविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका देखील होणार आहे.
या 3 संघांविरुद्ध मायदेशात होणार मालिका : बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही मालिका 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत खेळल्या जाणार आहेत. यानंतर न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यात दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, ही मालिका 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर इंग्लंडचा संघ जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. यात प्रथम दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 एकदिवसीय सामनेही खेळवले जातील. इंग्लंड आणि भारत यांच्यातील या दोन्ही मालिका 22 जानेवारी 2025 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान खेळल्या जाणार आहेत.
दिल्ली-कोलकाताला कसोटीचं यजमानपद नाही : या 5 महिन्यांत भारतीय संघ चेन्नई, कानपूर, बेंगळुरू, पुणे आणि मुंबई इथं सर्व 5 कसोटी सामने खेळणार आहे. म्हणजेच दिल्ली-कोलकाताला कसोटीचं यजमानपद मिळालेलं नाही. तिन्ही मालिकेदरम्यान दिल्ली आणि कोलकाता इथं एकच टी-20 सामना खेळवला जाईल. बांगलादेशविरुद्धचा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत होणार आहे. तर कोलकातामध्ये 25 जानेवारीला इंग्लंड विरुद्ध टी-20 सामना होणार आहे.
बांगलादेशचा भारत दौरा (2024) :
- 19 ते 24 सप्टेंबर : पहिला कसोटी सामना, चेन्नई
- 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर : दुसरा कसोटी सामना, कानपूर
- 6 ऑक्टोबर : पहिला टी-20 सामना, धर्मशाला
- 9 ऑक्टोबर : दुसरा टी-20 सामना, दिल्ली
- 12 ऑक्टोबर : तिसरा टी-20 सामना, हैदराबाद
न्यूझीलंडचा भारत दौरा (2024) :
- 16 ते 20 ऑक्टोबर : पहिला कसोटी सामान, बेंगळुरु
- 24 ते 28 ऑक्टोबर : दुसरा कसोटी सामना, पुणे
- 1 ते 5 नोव्हेंबर : तिसरा कसोटी सामना, मुंबई
इंग्लंडचा भारत दौरा (2025) :
- 22 जानेवारी - पहिला टी-20 सामना, चेन्नई
- 25 जानेवारी - दुसरा टी-20 सामना, कोलकाता
- 28 जानेवारी - तिसरा टी-20 सामना, राजकोट
- 31 जानेवारी - चौथा टी-20 सामना, पुणे
- 2 फेब्रुवारी - पाचवा टी-20 सामना, मुंबई
- 6 फेब्रुवारी - पहिला एकदिवसीय सामना, नागपूर
- 9 फेब्रुवारी - दुसरा एकदिवसीय सामना, कटक
- 12 फेब्रुवारी - तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद
हेही वाचा :
- भारतीय महिलांचा आफ्रिकेवर 4 धावांनी विजय, मालिकाही घातली खिशात; सामन्यात झाली चार शतकं - INDW vs SAW
- विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात स्मृती मंधानाचं 'राज'; सलग दुसरं शतक झळकावत रचला इतिहास - smriti mandhana
- टी-20 विश्वचषक कोण जिंकणार ? 17 वर्षांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास भारत सज्ज - T20 World Cup 2024