मेलबर्न AUS Beat PAK by 2 Wickets : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी क्रिकेट संघाचा प्रवास पराभवानं सुरु झाला आहे. वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाला पहिल्याच सामन्यात 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सोमवार 4 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही बाजूंच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळाली पण फरक एवढाच होता की ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज विकेट घेण्यासोबतच किफायतशीर ठरले. तसंच पाकिस्तानच्या कसोटी संघाबाहेर असलेला स्टार फलंदाज बाबर आझम या मालिकेतून संघात परतला पण तो परतताच पाकिस्तानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. योगायोगानं त्याला संघातून वगळल्यानंतर पाकिस्ताननं सलग 2 सामने जिंकून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती.
A quality start to the ODI series!
— cricket.com.au (@cricketcomau) November 4, 2024
The Aussies take the win in a close one in Melbourne #AUSvPAK pic.twitter.com/CjLMFW9DXS
स्टार्कसमोर पाकिस्तानी फलंदाजी अपयशी : पाकिस्ताननं या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पण मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. कसोटीनंतर वनडेत दाखल झालेली अब्दुल्ला शफीक आणि सैम अयुब ही जोडी इथंही अपयशी ठरली. वनडेत पदार्पण करणाऱ्या अयुबला पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कनं बाद केलं, तर पुढच्याच षटकात स्टार्कनं शफीकलाही बाद केलं. कसोटी संघातून वगळल्यानंतर वनडे मालिकेत पुनरागमन करणाऱ्या बाबर आझमनं येताच काही चांगले फटके मारले पण त्यानंतर तो लेगस्पिनरविरुद्ध अपयशी ठरला आणि ॲडम झाम्पाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
The pacers give it their all in a hard-fought contest at the MCG!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2024
Australia win the first ODI by two wickets 🏏#AUSvPAK pic.twitter.com/33tlPGH7Ap
गोलंदाजांचं फलंदाजीत योगदान : पाकिस्तानचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवाननं बराच वेळ क्रीजवर राहून डावावर नियंत्रण ठेवलं. पण तोही 44 धावा करुन बाद झाला. पाकिस्ताननं केवळ 117 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. पण इथं नसीम शाहनं फलंदाजीनं संघाची स्थिती सुधारली. युवा वेगवान गोलंदाजानं आपल्या बॅटची ताकद दाखवत 40 धावा केल्या आणि संघाला 203 धावांपर्यंत नेलं, यामुळं संघ सामन्यात टिकून राहिला. तर पदार्पण करणाऱ्या इरफान खान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही छोट्या पण उपयुक्त खेळी खेळल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कनं 3 तर कर्णधार पॅट कमिन्सनं 2 बळी घेतले.
8 विकेट्स गमावूनही ऑस्ट्रेलियानं मिळवला विजय : ऑस्ट्रेलियाची सुरुवातही चांगली झाली नाही. चौथ्या षटकापर्यंत मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा वेळी स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि यष्टिरक्षक जोश इंग्लिश यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि झटपट धावा केल्या. दोघांमध्ये 85 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला गेला. यावेळेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत असल्याचं दिसत होतं पण अचानक हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी स्मिथ-इंग्लिससह ऑस्ट्रेलियन मधली फळी उद्ध्वस्त केली. काही वेळातच ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 बाद 155 अशी झाली. येथून कर्णधार पॅट कमिन्सनं जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर मिचेल स्टार्कच्या साथीनं संघाला विजयाकडे नेले. कमिन्स 33 धावा करुन नाबाद राहिला.
हेही वाचा :
- आकाश दीपच्या नावावर फलंदाजीत अनोखा विक्रम... 147 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' कोणालाच जमलं नाही
- मागील पराभवाचा बदला घेत स्कॉटीश संघ विजय मिळवणार की भारताचे शेजारी वर्चस्व राखणार? निर्णायक वनडे 'इथं' दिसेल लाईव्ह
- ना लंडन, ना सिंगापूर... अखेर 'या' शहरात पहिल्यांदाच होईल IPL 2025 लिलाव, तारीखही निश्चित