राजकोट R Ashwin Withdraw from 3rd Test : राजकोट कसोटीदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. रविचंद्रन अश्विननं चालू सामन्यातून माघार घेतलीय. कौटुंबिक कारणामुळं त्यांनं आपलं नाव मागं (Ashwin withdraws from Rajkot Test) घेतलंय. अश्विन आता आपल्या घरी परतलाय. मात्र, त्याच्या जागी अंतिम संघात कोणाचा समावेश होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे.
बीसीसीआयनं दिली माहिती : अश्विननं कौटुंबिक कारणामुळं सामन्यातून माघार घेतल्याबाबत बीसीसीआयनं खुलासा केलाय. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय, "या गंभीर परिस्थितीत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि सर्व सदस्यांसह संघातील सहकारी, कर्मचाऱ्यांचा अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा आहे. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे." "तसंच अशा परिस्थितीत भारतीय बोर्ड आणि संघ अश्विनला सर्व सुविधा पुरवत राहतील. काही गरज पडल्यास त्यासाठी अश्विनशी चर्चा सुरु राहील," असंही बीसीसीआयनं म्हटलंय.
इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 238 धावांनी पिछाडीवर : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 445 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघानं 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ या धावसंख्येसह खेळण्यास सुरुवात केली. भारतीय संघाकडून आतापर्यंत फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतलाय.
अश्विननं राजकोट कसोटीत रचला इतिहास : राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फिरकीपटू अश्विननं एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानं जॅक क्रॉलीला बाद करत कसोटीत 500 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. अश्विनच्या पुढं फक्त माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे, त्यानं 619 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा :