पुणे:- राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आज एकीकडे अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकसभेत बारामतीच्या जनतेने सुप्रिया सुळे यांना भरभरून मतदान केलंय, तेच मतदान विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांना होताना पाहायला मिळेल का? असं शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझा बारामतीच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. राज्याच्या राजकारणात मला शक्ती देण्याचं काम बारामतीमधील जनतेने केलंय आणि त्याची सुरुवात 1965 पासून झाली असून, ती आजपर्यंत सुरूच आहे. माझा आतादेखील बारामतीच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून, या निवडणुकीतदेखील बारामतीकर महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करतील, असं यावेळी शरद पवार म्हणालेत.
बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, वडील श्रीनिवास पवार आणि आई शर्मिला पवार आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. पवार म्हणाले की, आज बारामती विधानसभा मतदारसंघातून तरुण उमेदवार युगेंद्र पवार याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलोय. युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालंय. एक उच्चशिक्षित, पदवीधर आणि प्रशासनाचा जाणकार असलेला हा उमेदवार आहे. मला खात्री आहे की बारामतीची जनता ही नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा स्वीकार करतील आणि आपली शक्ती उभी करतील, असं यावेळी शरद पवार म्हणालेत.
महाराष्ट्रातील सगळ्याच विधानसभेचा आढावा घेत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिलाय. जवळपास 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्यात. यासाठी राज्यातील जनतेचा मी आभारी आहे. मी त्यांना आश्वासन देतो की, तुम्ही जी कामगिरी केलीय, त्याची नोंद आम्ही आमच्या अंतःकरणात कायम ठेवलीय. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीला सुरुवात झालीय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व जागा लढत आहोत. महाविकास आघाडीत 90 ते 95 टक्के जागांवर एकमत झालंय. काही थोड्या जागांवर विचारविनिमय सुरू आहे. एक ते दोन दिवसात तेही पूर्ण होईल, आम्हाला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायचंय. कारण ज्यांच्याकडे आज राज्याची सत्ता आहे, त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न हे सोडवले गेले नाहीत, असंही शरद पवारांनी अधोरेखित केलंय.
युगेंद्रला काय कानमंत्र देणार असं विचारलं असता पवार म्हणाले की, 57 वर्षांपूर्वी मी बारामतीच्या तहसील कार्यालयात स्वतःचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलंय. याच कारण जनतेशी असलेली बांधिलकी आणि विनम्रता, तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर हेच मी नव्या पिढीला सांगणार असल्याचं यावेळी पवार म्हणालेत. महाविकास आघाडीकडून अजूनही काही जागांवर तिढा सुटलेला नाही, याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत चर्चा सुरू असून, काही ठिकाणी दोन उमेदवार दिले असले तरी सध्या अर्ज भरून ठेवा, असं सांगण्यात आलंय. यातून देखील मार्ग काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये बहुतांश जागांवर चर्चा झाली असून, काही जागांवर चर्चा सुरू आहे. तसेच लवकरच त्यांच्या देखील प्रश्न मिटणार आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.
महायुतीकडून या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेला पुढे केलं जातंय, याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, निवडणुकीत उभा राहणारा प्रत्येक जण हे सांगत असतो की, मी निवडून येणार आहे. तर हे सांगत नाही की, मी निवडून येणार नाही. ज्या काही सुविधा सरकारने या पाच महिन्यांत दिल्यात त्या पाहिल्या तर साडेचार वर्ष त्यांच्या हातात सत्ता होती, तेव्हा कधी यांना बहिणींची आठवण झाली नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांना आता लाडक्या बहीण लाडके भाऊ हे सर्व आठवत आहे, असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावलाय.
हेही वाचा :