कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून, सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून युध्द सुरू आहे. दरम्यान, कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीतील फूट चव्हाट्यावर आली आहे.
पाठीत खंजीर खुपसला : "लोकसभा निवडणुकीत कागलच्या राजकारणात मंडलिक गटाबद्दल चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं. लोकसभेची जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेलाच मिळावी, अशी आमची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा मिळवून दिली. मात्र, महायुतीचा भाग असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी युतीचा धर्म न पाळता आमच्या पाठीत खंजीर खुपसला," असा हल्लाबोल करत माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी कागल विधानसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. वीरेंद्र मंडलिक यांच्या मागणीमुळं कागलमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय.
शिवसेना पक्षाकडून मला उमेदवारी मिळावी : कोल्हापूर जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळ आणि कागल तालुक्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडणूक लढवली. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझे आजोब दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मुश्रीफ यांना आमदार केलं, दोन वेळा मंत्री केलं तरी तुम्ही त्यांच्याच नातवाला विरोध का करता. कागल उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या मुश्रीफ यांच्या विरोधात परिस्थिती असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या मंत्री हसन मुश्री यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा.मंडलिक गटानं गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिलीय. त्यामुळं शिवसेना पक्षाकडून मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
मंडलिक गटाच्या उपकाराची परतफेड करा : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दोन वेळा मांडली गटानं आमदार केलं, त्यानंतर ते राज्याचे मंत्री झाले. मात्र, आता विधानसभा मतदारसंघातील 10 पैकी 8 लोक मुश्रीफ यांना आमदार करण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळं त्यांनी आता थांबावं. महायुतीची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मला मिळावी, अशी वीरेंद्र मंडलिक यांनी केलीय. मंडलिक गटाच्या या भूमिकेमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय मंडलिक यांची काय समजूत काढणार? की मंडलिक गट वेगळा निर्णय घेणार? याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा