कोल्हापूर BJP National President : एकेकाळी भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी नाकारलेल्या आणि विरोधकांचं सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या विनोद तावडेंना (Vinod Tawde) आता राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात तावडे यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. 2020 पासून केंद्रीय स्तरावर पक्षबांधणीसाठी झोकून काम करणाऱ्या तावडे यांचं मंत्रिपदही एकेकाळी काढून घेण्यात आलं होतं. देश पातळीवरील अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रभागी राहिलेल्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं बाळकडू अंगी असलेल्या तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कारकिर्दीची घडी पक्की बसवली आहे, याला मोदी आणि शाहांचं बळ मिळाल्यामुळं भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत विनोद तावडे सध्या जोमात आहेत. परिणामी केंद्रीय स्तरावर तावडे यांचं वजन वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
तावडे यांचं मंत्रिपद काढून घेतलं : राज्यात 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेनेचं युती सरकार आल्यानंतर मुंबईतील बोरीवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवलेल्या विनोद तावडे यांना राज्याचं शिक्षण मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांची उमेदवारी डावलण्यात आली. मात्र पक्ष संघटनेत अन्याय होऊनही तावडेंनी राष्ट्रीय पातळीवर अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलल्या, 2020 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव पद मिळाल्यानंतर त्यांचा राज्याच्या राजकारणातील ओढा कमी झाला. बिहार सारख्या मोठ्या राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळताना लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तावडेंनी संघटना कौशल्याच्या बळावर नितीश कुमार यांच्यासारख्या नेत्याला भाजपासोबत आणण्यात यश मिळवलं. याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार करताना भाजपाला झाला, याचं खरं श्रेय तावडे यांनी केलेल्या नियोजनबद्ध राजकारणात पाहायला मिळतं.
ओम माथुर, सुनील बन्सल, के लक्ष्मण यांचीही नावं चर्चेत : भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 30 जून रोजी संपणार आहे. त्यांनाही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांच्यात टफ फाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात बन्सल यांनी शाह यांच्यासोबत सूक्ष्म नियोजनासाठी काम केलं तर पश्चिम बंगाल तेलंगाणा, ओडिशा राज्याचे प्रभारी असलेल्या बन्सल यांच्या नेतृत्वात भाजपाला चांगलं यश मिळालं. दुसरीकडं राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारसह हरियाणा, चंदिगडचे प्रभारी म्हणून लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. ओम माथुर आणि के बन्सल ही नावंसुद्धा डार्कहॉर्स आहेत. या कामगिरीच्या जोरावरच मेरिटनुसार पक्ष नेतृत्व कुणाला अध्यक्षपदाचा कौल देते हे पाहणं आवश्यक ठरणार आहे. वेगवेगळी नावं चर्चेत ठेऊन भलत्याच उमेदवाराला पुढे आणण्याची भाजपाची नीतीही विसरुन चालणार नाही.
राज्याच्या राजकारणावर होणार परिणाम : विनोद तावडे राज्याच्या मंत्रिमंडळात असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता. यावेळी राज्यातील युती सरकारला याचा फटका बसू नये यासाठी मराठा नेत्यानं राज्याचं नेतृत्व करावं असा एक प्रवाह भाजपा अंतर्गत सुरू होता. मात्र तेव्हाही विनोद तावडे यांचं नाव माग पडलं. आता देशातील केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत विनोद तावडे यांनी पक्षासाठी केलेली बांधणी पक्षाला उर्जित अवस्था निर्माण करून देत आहे यामुळंच अनेक विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोण असावा याचा निर्णय तावडे घेत आहेत, राज्याच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, अशातच तावडे यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यास याचे थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहेत.
विनोद तावडे 'वेट अँड वॉच' मोडमध्ये : अर्थात या सर्व बाबी सध्या चर्चेच्या पातळीवरच आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतल्या नेत्याची वर्णी लागेल, हे उघड गुपित आहे. भाजपात प्रामुख्याने संघ स्वयंसेवक किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेल्या नेत्याला प्राधान्य दिलं जातं. त्यातही संघातून आलेल्या व्यक्तीला अधिक झुकतं माप मिळतं. तावडे हे अभाविपमधून पुढे आले आहेत. त्यामुळं संघ त्यांच्या नावाला पसंती दर्शवेल की कसे? हा महत्त्वाच प्रश्न आहे. जर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विनोद तावडे यांची बस हुकली तर त्यांना राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान दिलं जाऊ शकतं. काही राजकीय विश्लेषक तर त्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री' असा करतात. तावडे स्वतः मात्र 'वेट अँड वॉच' मोडमध्ये आहेत. भाजपात त्यांच्या नावाचं पिल्लू सोडून घात घडवून आणण्याची शक्यता ते जाणून आहेत. याआधीसुद्धा त्यांनी पक्षातलं राजकारण अनुभवलं आहे. तावून सुलाखून निघण्याच्या प्रक्रियेत आपला संयम हेच शक्तिस्थान आहे, हे तावडे जाणून आहेत. त्यामुळं संयम राखता ते आस्ते कदम वाटचाल सुरुच ठेवतील. हे करत असताना ध्येयावरची त्यांची नजर हटणार नाही, हे त्यांना जवळून ओळखणारे सांगतात.
हेही वाचा -
- महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट, फडणवीसांची संघ नेतृत्वासोबत बैठक - Vinod Tawde meets Amit Shah
- काँग्रेसचा मोठा मासा भाजपाच्या गळाला; अरविंदर सिंह लवलींच्या हातात 'कमळ' - Arvinder Singh Lovely joins BJP
- मराठमोळ्या विनोद तावडेंची बिहारमध्ये चर्चा; सत्ता परिवर्तनात महत्त्वाची भूमिका