पालघरः डहाणूचे माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी मतदारसंघातील गाव आणि पाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन प्रचार मोहीम राबवण्यावर भर दिला आहे. त्यांच्या प्रचारात सामाजिक कार्यकर्ते, धर्मनिरपेक्षतेशी बांधीलकी असणारे नेते उतरले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
महायुतीनं या मतदारसंघातून विनोद मेढा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर टीका केली. आमदार निकोले यांच्यावरही विकासात अडथळे आणत असल्याचा आरोप केला. त्यावर निकोले यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन महायुतीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीसह अन्य सामाजिक संस्थांचे कार्यकते आणि चळवळीतील नेते निकोले यांच्या प्रचारात उतरले आहेत. वाढवण बंदराला विरोध कायम ठेवताना भाजपाचे नेते जनतेची कशी दिशाभूल करतात, यावर प्रचारात भर दिला जात आहे.
- विचाराच्या ताकदीने लढाई जिंकू- आमदार विनोद निकोले यांनी भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांवर जोरदार टीका केली. "भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. पैशाच्या जोरावर नव्हे, तर विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे." असे ते म्हणाले.
पथनाट्यातून प्रचार- ‘एसएफआय’ आणि ‘डीवायएफआय’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय पथनाट्य सादर केले. समाजातील विविध समस्या, ग्रामीण भागातील विकासाची आवश्यकता, महिला सक्षमीकरण, तसेच तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या पथनाट्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. आमदार निकोले यांनी डहाणूतील जनतेसाठी सुरू केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी रोजगारनिर्मिती, शिक्षणाच्या सोयीसुविधा, आदिवासींचे हक्क आणि जमिनीच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.
अतिशय कमी खर्चात निवडणूक-जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्यानं प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून आमदार विनोद निकोले यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी सरकारकडून संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नाही. अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. वर्षानुवर्षे जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून जिंकणाऱ्या आमदार निकोले यांनी निवडणुकीचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक-डहाणूचे माकपचे आमदार कॉ. विनोद निकोले यांची साधा आणि गरीब आमदार म्हणूनच ओळख आहे. त्याचबरोबर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आमदार निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात.
झूट, लूट, फूट सरकार! ‘भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी महायुती सरकार "झूट, लूट, फूट सरकार" असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. "लोकशाहीत विचारांची ताकद आहे, पैशांची नव्हे," असे सांगत खोटे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे त्यांनी आवाहन केले.
आदिवासींवर अन्याय करता आणि राष्ट्रपती केल्याचे ढोल बडवता- राज्य समन्वयक उल्का महाजन म्हणाल्या," गद्दारांनी देशाचे तुकडे करण्याचा डाव आखला आहे. अशा लोकांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी, कोणत्याही राजकीय पक्षाशी न जोडता आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हक्कांसाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी तयार केलेल्या अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पेसा कायद्याचे महत्व आहे. मात्र विविध प्रकल्पांच्या माध्यमातून या कायद्यांची पायमल्ली होत आहे. छत्तीसगड आणि मणिपूरमध्ये आदिवासींवर अन्याय चालू असताना आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यानं काय फरक पडतो ?"असा सवाल त्यांनी केला.
महिलांसाठी स्वतंत्र सभा- निकोले यांच्या प्रचारासाठी तलासरी तालुक्यातील डोंगारी (संभा जिल्हा परिषद गट), डहाणू तालुक्यातील खुनवडे (बोर्डी जिल्हा परिषद गट) आणि कैनाड जिल्हा परिषद गटातील वाकी येथे सभा झाल्या आहेत. वाकी येथे महिलांसाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मरियम ढवळे, किरण गहला, लक्ष्मण डोंबरे, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश खरपडे आदींनी सभेत भाषण केली आहेत.