पुणे Dattatray Bharane Viral Video : इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अर्वाच्च भाषेत मतदारांना शिवीगाळ करणारा आणि धमकी देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे.
पोस्टमध्ये काय म्हणालेत रोहित पवार? : रोहित पवारांनी सदरील व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला असून ते म्हणालेत की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानानं बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा, विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही", असं रोहित पवार म्हणालेत.
दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात प्रतिक्रिया देत दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मी माझ्या मराठी भाषेत बोललो असून मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यानं मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथं कार्यकर्त्यांचं भांडण सुरू होतं. मी तिथं गेलो, त्यावेळी बारामती अॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्यानं माझ्या विरोधातही अपशब्द वापरले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असंल, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथं नसतो तर अनर्थ घडला असता. तो पैशाचं वाटप करत होता." तसंच मी दबाव टाकत असल्याचं वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसताय. त्यांचे जबाब नोंदवावे. तिथे पैशाचं वाटप कोण करत होतं, नोकऱ्यांचं आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगातही मी हेच याची माहिती देईन. तसंच तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीनं उत्तर देणार असल्याचंही भरणे म्हणाले.
हेही वाचा-