पुणे Supriya Sule On Amit Shah :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह हे राज्यात विविध ठिकाणी दौरे करीत आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अतिथी देवो भव म्हणून पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे. आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, तर आम्ही संविधानवाले आहोत. संविधान केंद्रबिंदू ठेवून आम्ही राजकारण करतो आणि सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही: पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका करतात. याबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या की, शरद पवारांना रोखा, उद्धव ठाकरेंना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये असं अमित शाह म्हणाले आहेत. मला गंमत वाटते की, भाजपा हा किती जुना पक्ष आहे. तरीही आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलल्या, खुर्च्या उचलल्या आणि पक्षासाठी मेहनत घेतली ते कुठे गेले? त्यांना का न्याय मिळत नाही? चांदीच्या ताटात जेव्हा जेवायची वेळ येते, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते बसत नाहीत, तर बाहेरून आलेले बसतात, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचा पक्ष विचारधारेनं चालतो: सुप्रिया सुळे आजच्या सोशल मीडिया शिबिराबाबत म्हणाल्या की, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने दोन-तीन महिन्यांनी अशी शिबिरं घेतच असतो. आमचा राजकीय पक्ष आहे, जो विचारधारेने चालतो. पॉलिसी लेवलला सरकार काय निर्णय घेते, त्याचे प्लस पॉइंट, मायनस पॉइंट काय असतात. देशाबरोबरच राज्यातील गोष्टींवर आजच्या शिबिरात मनमोकळी चर्चा होणार आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्यासंदर्भात केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, डेटा फार महत्वाचा आहे. जो महारष्ट्र सरकारकडून येतो, तुम्ही किती कर्ज घेऊ शकता, केंद्र किंवा राज्याला काही मर्यादा अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घालण्यात आल्या होत्या.
आयुष्य उद्ध्वस्त करून पक्षचिन्ह घेऊन गेले: पक्ष लढाईबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. वर्षभरापूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत. एका वर्षांपूर्वी ना पक्ष कुठे होता, ना चिन्ह कुठे होतं. आमदार आणि खासदार सत्तेची पद उपभोगण्यासाठी आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून पक्ष चिन्ह घेऊन निघून गेले. आम्ही तर मुलीचा वाढदिवसदेखील कोर्टात केला. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला साथ दिली. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला. अदृश्य शक्तीला वाटलं होतं की ते दिल्लीत बसून काहीही करू शकतात. परंतु हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हे महाराष्ट्रानेही दाखवून दिल्याचं सुप्रिया मिळेल म्हणाल्या. पक्षात अजून काही इनकमिंग होणार असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू असतो. माझी वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई कोणाशी नाही. मी कोणाशी कधीही संबंध तोडले नाहीत, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
हेही वाचा -