मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी आज महाविकास आघाडीनं संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडं अजूनही महायुतीचं जागावाटपावरुन ठरत नाहीय. दरम्यान, महायुती आणि मुख्यतः भाजपा घराणेशाहीवरून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि विरोधकांवर टीका करत आहे.
...ही घराणेशाही नाही का? : इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य दिलं. सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा पक्षातील तळागळातील लोकांना संधी दिली नाही. त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झाला, असा आरोप भाजपा सतत करत आहे. मात्र, आता महायुतीतील कल्याण जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच धक्का दिलाय. तर बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुन्नेत्रा पवार ह्या निवडणूक लढवणार आहेत. मग ही घराणेशाही नाही का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत महायुती आणि भाजपावर टीका केलीय.
अब राजा का बेटा राजा नहीं होने बनेगा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घराणेशाहीवरून (शिवसेना) उद्धव ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले होते की, यांच्यामध्ये घराणेशाही आहे. तीच तीच लोकं पक्ष चालवत आहेत. देशात काँग्रेसनेही घराणेशाहीला वाव दिल्यामुळं अन्य लोकांवरती अन्याय झाला. महाराष्ट्रातही घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व काही स्वतःच्याच घरात मुख्यमंत्री पद, मंत्रीपद, आमदार असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. तसेच पात्रता नसताना या लोकांनी स्वतःकडं महत्त्वाची पदं ठेवली आणि घराणेशाही सुरु ठेवली. पण यापुढे "अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, बल्की राजा वही बनेगा जिसके अंदर काबिलत है..." असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्याच मुलाला लोकसभेचे उमेदवारी दिल्यामुळं विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं जातय.
ही खोटारडी लोकं आहेत : महायुती आणि भाजपानं देशातील घराणेशाहीला विरोध केला आहे. वर्षानुवर्ष फक्त घरातील लोकांनाच महत्त्वाचं स्थान मिळालं अशी टीका भाजपा करत आहे. मात्र, आता दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी मिळाली आहे. मग याला घराणेशाही म्हणायचं नाही का? असा सवाल (शिवसेना) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केलाय. एकीकडं घराणेशाही म्हणायचं, घराणेशाहीला विरोध करायचा आणि दुसरीकडं स्वतःच्याच घरात उमेदवारी द्यायची, हा खोटारडेपणा आहे. बोलायचं एक आणि करायचं दुसरं आणि जनतेला दाखवायचं वेगळं हे सध्या भाजपा आणि महायुतीतील पक्ष करत आहे असा टोला, खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि महायुतीला लगावला.
आम्ही पहिल्यांदा इतरांना प्राधान्य दिलं : घराणेशाहीवरुन तुम्ही विरोधकांवर टीका करत असताना, आता तुमच्यात पक्षात घरात उमेदवारी दिली आहे, असा प्रश्न मंत्री शंभूराज देसाई यांना विचारला असता "आम्ही पहिल्यांदा इतरांना उमेदवारी दिली. त्यानंतर आम्ही उमेदवारी घेतली... आम्ही इतरांसारखे (ठाकरे गट) आमदार..., मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद स्वत:कडे घेतले नाही. सर्व काही आम्ही पहिल्यांदा घेतले नाही. तर आम्ही इतरांना पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर आम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर केली". असं सारवासारवीच उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी घराणेशावरून दिले आहे. तर "गेली 25-30 वर्ष स्वतःच्याच घरात महत्त्वाची पदं ठेवणे किंवा स्वतःकडे सत्तेचं केंद्रबिंदू ठेवणे याला आमचा विरोध आहे, आम्हाला अशी घराणेशाही अपेक्षित नाही असं शिंदे गट (शिवसेना) प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे".
देशात सर्वच पक्षात घराणेशाही : सध्या घराणेशाहीवरून भाजप विरोधकांवर टीका करत आहे. मात्र देशातील सर्वच पक्षात थोड्याफार प्रमाणात घराणेशाही दिसून येत आहे. फक्त ही घराणेशाही भारतातच नाही आहे तर जगातील अनेक देशांमध्ये घराणेशाही दिसून येत आहे. आणि ही घराणेशाही वारसाहक्काने चालत आलेली आहे. वारसाहक्काने चालत आलेल्या घराणेशाहीला नाकारता येणार नाही. शेवटी जनतेनंही या लोकांना स्विकारलेलं असते, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. तसेच जो भाजप विरोधकांवर घराणेशाहीचा आरोप करत आहे त्या भाजपा पक्षामध्ये देखील घराणेशाही आहे. देशात भाजप पक्षाने अनेक राज्यांमध्ये घराणेशाहीचेच उमेदवार दिले आहेत. मग ही घराणेशाही नाही आहे का? असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलेय.
हेही वाचा -
- जागावाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024
- 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024
- "शिवसेना शिंदे गटाकडून तिकिट देण्याचं आश्वासन देऊनही मुलानं ऐकलं नाही, म्हणून..." गजानन कीर्तिकर यांचा गौप्यस्फोट - lok Sabha election 2024