पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेल्यानं ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजाअर्चा करण्यासाठी का जातात असं म्हणत टीका केली आहे.
महायुतीवर टीका : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झालेल्या ईव्हीएम घोटाळ्यावरून आत्मक्लेश आंदोलनं पुकारलं होतं. बाब आढाव यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरेही आज पुण्यात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांचं आंदोलन सोडवलं. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
शेतात पुजा अर्चा करण्यासाठी का? : "योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे. या घोळात एक मोठा विषय इव्हीएमचा आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात 76 लाख मतं कशी वाढली? याचं उत्तर कोणाकडेच नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजाअर्चा करण्यासाठी का जातात. अमावस्येला पुजाअर्चा करण्यासाठी गेलेत यावरुनच यांची मानसिकता दिसुन येते," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
अजित पवारांना टोला : उद्धव ठाकरे म्हणाले, "मी या ठिकाणी दोन वेळा येऊन गेलो. पण आजचा दिवस हा लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव हे प्रेरणा देणारे असून प्रेरणा ही कधीही म्हातारी होऊ शकत नाही. आज आपण पाहिलं तर हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही." राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी आज बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "माझ्या आधी येथे येऊन गेले त्यांना देखील विश्वास नाही की, त्यांचे एवढे आमदार जिंकून कसे आले, " असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला.
हेही वाचा